प्रीती राठी हत्या प्रकरणी अंकुर पनवारला फाशी
By Admin | Updated: September 8, 2016 15:44 IST2016-09-08T15:25:09+5:302016-09-08T15:44:59+5:30
प्रीती राठी अॅसिड हल्ल्यातील आरोपी अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे

प्रीती राठी हत्या प्रकरणी अंकुर पनवारला फाशी
(प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा सिद्ध)
(प्रीती राठीच्या हल्लेखोराल उद्या होणार शिक्षा)
(प्रीती राठी प्रकरण - अंकुर पनवार दोषी; शिक्षेचा निर्णय आज)
प्रीती आणि अंकुर नवी दिल्लीच्या नरेलाच्या एकाच कॉलनीमध्ये राहत होते. अंकुरला नोकरी मिळता मिळत नव्हती तर प्रीतीला आयएनएस अश्विनी येथे लेफ्टनंट (नर्सिंग) म्हणून नोकरी मिळाली. प्रीतीच्या करिअरचा चढता आलेख, तिचे यश पाहून पनवार कुटुंबीय अंकुरला सतत हिणवत व ओरडत असत. ‘दिल्लीला असतानाही अंकुर प्रीतीला मानसिक त्रास द्यायचा. एकदा त्याने विवाहाचा प्रस्तावही ठेवला होता. परंतु, हा प्रस्ताव फेटाळला, असे खुद्द प्रीतीनेच रुग्णालयात उपचार घेत असताना तिच्या एका मैत्रिणाला सांगितले होते. प्रीतीने त्याचा प्रस्ताव नाकारल्याने अंकुरने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. प्रीतीच्या करिअरमुळे तिचा मत्सर करणाऱ्या अंकुरने प्रीती ज्या ट्रेनने मुंबईला येत होती ती ट्रेन पकडली. प्रीती २ मे २०१३ रोजी वांद्रे स्थानकावर उतरली. तिच्याबरोबर अंकुरही ट्रेनमधून उतरला. संधी मिळताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकले आणि दुसरी ट्रेन पकडून तो मुंबईतून पसार झाला. अॅसिडहल्ल्यानंतर प्रीतीची प्रकृती बिघडली. एक महिना तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची फुप्फुसे निकामी झाली होती. अखेरीस १ जून रोजी तिचा मृत्यू झाला.
या केसमध्ये विशेष सरकारी वकिलांनी ३७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने न्यायालयात सांगितले की, राठी वांद्रे टर्मिनसला उतरली त्या वेळी डोक्यावर पांढऱ्या रंगाची कॅप आणि चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळलेला २० ते २५ वर्षांचा तरुण तिच्याजवळ आला. बॉक्समधून अॅसिडची बाटली काढली आणि त्यातील अॅसिड तिच्या चेहऱ्यावर फेकून तो फरार झाला. अंकुर पनवार याला पोलिसांनी एप्रिलमध्ये अटक केली. त्याच्यावर पोलिसांनी १,३२२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात ९८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली..
भारतात अॅसिडहल्ल्याच्या सर्वाधिक केसेस
भारतात अॅसिड हल्ल्याच्या सर्वाधिक केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. दरवर्षी जगात अॅसिड हल्ल्याच्या १५०० केसेस नोंदवण्यात येतात. त्यातील एक हजार केसेस केवळ भारतातच नोंदवण्यात येतात. २०१३मध्ये अॅसिडहल्ल्याचा समावेश फौजदारी गुन्हेगारीमध्ये केला. सर्वोच्च न्यायालयाने २०१३मध्ये बाजारात अॅसिड सहज उपलब्ध होऊ नये, यासाठी सरकारला आदेश दिला होता. तरीही बाजारात आजही अॅसिड सहजच उपलब्ध होत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे प्रीती राठी अॅसिडहल्ला केस.