Anjali Damania Husband: भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहारांवर बोट ठेवत नेत्यांवर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पतीची राज्य सरकारच्या थिंक टँकमध्ये नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रॉन्सफॉर्मेशन या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे वेगवेगळे अर्थ लावण्यास सुरूवात झाल्यानंतर अंजली दमानियांनी त्यावर सविस्तर भूमिकाही मांडली आहे.
केंद्र सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून निती आयोगाची स्थापना केली. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे. मित्राच्या मानद सल्लागारपदी अंजली दमानियांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती झाल्याने राजकीय चर्चांनाही तोंड फुटले आहे.
'मित्रा'चे मुख्यमंत्री अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष
महाराष्ट्र परिवर्तन संस्थेचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपाध्यक्ष आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रांना विकसित करण्याच्या दृष्टीने धोरण तयार करण्याचे काम ही संस्था करते. त्यामुळे राज्य सरकारची थिंक टँक म्हणूनही या संस्थेकडे बघितले जाते.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
वेगवेगळे अर्थ या नियुक्तीचे लावण्यास सुरुवात झाल्यानंतर अंजली दमानियांनी भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, "माझ्या पतीकडे पाच पदव्या आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव बघूनच सरकारने त्यांना सल्लागार पद स्वीकारण्याची विनंती केली होती. ती अनिश यांनी स्वीकारली आहे."
"माझे पती जे.एम. फायनॅन्शियल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीही राहिलेले आहेत. सध्या ते कंपनीचे आंतरराष्ट्रीय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. तेव्हा गोयल यांनीच अनिश यांना फिक्कीचे सदस्य होण्याची विनंती केलेली", असेही दमानियांनी सांगितले.
"फिक्कीनंतर त्यांनी मित्रा संस्थेचे सदस्यत्व स्वीकारलं आहे. अनिश यांनी ही माहिती सोशल मीडियावरही शेअर केली. मी सुद्धा त्यांची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यात लपवण्यासारखं काहीही नाही. काहींनी अंजली दमानियांच्या पतीला राज्य सरकारकडून काहीतरी मिळालं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, तसं नाहीये. एक रुपयाही न घेता ते ही सगळी कामे करणार आहेत", असा खुलासा अंजली दमानियांनी केला आहे.