परीक्षेच्याच दिवशी अनिरुद्धची अंत्ययात्रा

By Admin | Updated: March 1, 2017 03:32 IST2017-03-01T03:32:31+5:302017-03-01T03:32:31+5:30

बदलापूर येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी टिपण घेण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध शंभरकर (१८) या विद्यार्थ्याचा चालत्या रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला.

Aniruddha's funeral on the day of the examination | परीक्षेच्याच दिवशी अनिरुद्धची अंत्ययात्रा

परीक्षेच्याच दिवशी अनिरुद्धची अंत्ययात्रा


कल्याण : बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी बदलापूर येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी टिपण घेण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध शंभरकर (१८) या विद्यार्थ्याचा चालत्या रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला. मंगळवारपासून त्याची परीक्षा सुरु होणार होती. मात्र त्या दिवशी त्याची अंत्ययात्रा निघाल्याने तो राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली होती.
अनिरुद्ध हा उल्हासनगरातील कॅम्प नंबर चार परिसरातील गुरुनानक चौकात ‘करुणा’ इमारतीत राहत होता. चांदीबाई महाविद्यालयात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा तो विद्यार्थी होता. त्याची मंगळवार २८ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु होणार होती. आदल्या दिवशी परीक्षा केंद्र शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला. होली फॅमिली या शाळेतील त्याचे परीक्षा केंद्र त्याने पाहिले. त्यानंतर तो सोमवारी रात्री बदलापूरला त्याच्या मित्राकडे टिपण घेण्यासाठी गेला होता. तो टिपण घेऊन परत येत असताना चालत्या रेल्वे गाडीतून बदलापूर-अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. चालत्या गाडीतून पडून तो रेल्वे रुळालगत असलेल्या झुडपात फेकला गेला. डोक्याला मार लागलेला असताना अनिरुद्धने त्याच्या घरी मोबाईलवर फोन केला तेव्हा त्यांच्या कण्हण्याचा आवाज त्याच्या घरच्या मंडळींना आला. मात्र आपण रेल्वेतून पडलो आहोत हे तो धड सांगू शकला नाही. त्या आधीच बहुदा तो बेशुद्ध झाला असावा.
घरच्या मंडळींनी लागलीच त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. अनिरुद्ध हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याला बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे होते. (प्रतिनिधी)
>अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान एक तरुण मुलगा पडला असल्याची माहिती पोलिसांकरवी त्याचे वडील व नातेवाईकांना मिळाली. पोलिसांच्या मदतीने पहाटे तीन वाजेपर्यंत रेल्वे रुळालगत अनिरुद्धचा शोध घेतला. पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गालगत झुडपात त्याचा मृतदेह सापडला.

Web Title: Aniruddha's funeral on the day of the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.