इच्छुकांची भाऊगर्दी अन् मित्रपक्षांची नाराजी
By Admin | Updated: January 14, 2015 04:24 IST2015-01-14T04:24:15+5:302015-01-14T04:24:15+5:30
राज्यातील सत्तेत प्रमुख भागीदार असलेल्या भाजपामध्ये विधान परिषदेवर जाण्याकरिता किमान दोन डझन इच्छुक आहेत. त्याचवेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज

इच्छुकांची भाऊगर्दी अन् मित्रपक्षांची नाराजी
संदीप प्रधान, मुंबई
राज्यातील सत्तेत प्रमुख भागीदार असलेल्या भाजपामध्ये विधान परिषदेवर जाण्याकरिता किमान दोन डझन इच्छुक आहेत. त्याचवेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष हे मित्र सत्तेत वाटा न मिळाल्याने नाराज आहेत. त्यामुळे आता स्वपक्षातील इच्छुकांना खूष करायचे की मित्र पक्षांना या कात्रीत भाजपा सापडला आहे.
विधान परिषदेच्या चार जागांकरिता निवडणुकीची अधिसूचना निघाली असून या निवडणुका स्वतंत्र घेतल्या जाणार असल्याने सर्वच्या सर्व जागा सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात जाणार आहेत. या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत २० जानेवारी असून ३० जानेवारीस मतदान होणार आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुभाष देसाई यांना मंत्री केले असल्याने त्यांना एक जागा सोडावी लागेल. याखेरीज उरलेल्या तीन जागांकरिता भाजपात दोन डझन इच्छुक आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुजीतसिंह ठाकूर, केंद्रीय नेत्यांच्या निकटवर्तीय शायना एन.सी., मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, मिलींद पाटील, गणेश हाके, केशव उपाध्ये, नीता केळकर, विनय नातू, बाळ माने आदींचा समावेश आहे.
भाजपामधील इच्छुकांपैकी तीन जणांची वर्णी लागली तर नाराज होणाऱ्यांची संख्या मोठी असेल. त्याचवेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पार्टी हे निवडणुकीतील मित्रपक्ष सत्तेत वाटा न मिळाल्याने नाराज आहेत. स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत व रासपाचे महादेव जानकर हे विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात हिंसक आंदोलन हाती घेतले. धनगर आरक्षणाचा मुद्दा ‘रासपा’ने पेटवला आहे. अशा वातावरणात खोत व जानकर यांचा विधान परिषदेवर समावेश केला नाही तर येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांची स्पेस हे मित्रपक्ष काबीज करतील आणि सरकारला डोकेदुखी निर्माण करतील, अशी भीती भाजपाला वाटते. रिपाइं आज शांत असली तरी दलित अत्याचाराच्या एखाद्या प्रकरणात तेही महाराष्ट्रात आपली शक्ती दाखवू शकतील. त्यामुळे मित्रपक्षांना सत्तेत सामावून घेणे ही भाजपाची गरज आहे. मात्र भाजपामधील इच्छुक मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाव्या याकरिता प्रयत्नशील आहेत.