हिमायतला नडला ‘बाळा’चा राग!
By Admin | Updated: February 26, 2015 06:02 IST2015-02-26T06:02:26+5:302015-02-26T06:02:26+5:30
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दहशतवादी हिमायत बेगला शहरातील एका ‘बाळा’ने कारागृहात मारहाण केली असून

हिमायतला नडला ‘बाळा’चा राग!
पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दहशतवादी हिमायत बेगला शहरातील एका ‘बाळा’ने कारागृहात मारहाण केली असून त्यावेळी त्याच्या बगलबच्च्यांनीही हिमायतला धमकाल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. कारागृहातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असून कराटेचा सराव करीत असताना एकमेकांना लाथ लागल्याच्या कारणावरुन हिमायतला धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेनंतर ‘बाळा’ ची रवानगी अंडा सेलमध्ये करण्यात आली.
येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये हिमायतला ठेवण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी हिमायत आणि काही कैदी कराटेचा सराव करीत होते. या दरम्यान बाळाची आणि हिमायतची एकमेकांना लाथ लागल्याच्या कारणावरून सुरुवातीला वादावादी होऊन नंतर किरकोळ धक्काबुक्कीही झाली. यावेळी बाळा, त्याचे काही साथीदार आणि अन्य टोळ्यांच्या काही गुंडांनी मधे पडत हिमायतला दमात घेतल्याचे समजते. याच अंडासेलमध्ये कुख्यात शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी कतिल सिद्दीकीचा खून केला होता. त्यामुळे हिमायतची पाचावर धारण बसली आहे.