...आणि दोन तरुणांना गमवावा लागला जीव
By Admin | Updated: July 29, 2016 19:17 IST2016-07-29T19:17:36+5:302016-07-29T19:17:36+5:30
एका कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना सायन येथे घडली. कारचा दरवाजा चालकाने उघडताच मागून येणाऱ्या बाईकची दरवाजाला धडक

...आणि दोन तरुणांना गमवावा लागला जीव
कारच्या उघडलेल्या दरवाजाला बाईकची धडक, बसनेही दोघांना चिरडले
मुंबई - एका कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना सायन येथे घडली. कारचा दरवाजा चालकाने उघडताच मागून येणाऱ्या बाईकची दरवाजाला धडक बसली आणि बाईकवर असलेले दोघे जण खाली कोसळताच मागून येणाऱ्या स्कूल बसने त्यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बस चालकाला अटक करण्यात आली असून कार चालकाने पलायन केले.
गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सायनमधील रोड नंबर २९ चम्पकलाल इस्टेट इमारतीजवळ एक होंडा सिटी कार उभी होती. होंडा सिटी कार चालकाने बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूचा दरवाजा उघडला. त्याचवेळी मागून अॅक्टीवा बाईकवरुन कुशल यादव (२0) आणि श्रवण बोराना (२0) हे दोघे जण येत होते. कारचा दरवाचा उघडताच बाईकची धडक दरवाजाला बसली आणि त्यात बाईकसह दोघेही खाली कोसळले. खाली कोसळताच त्यांच्याच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कूल बसने त्यांना धडक दिली. यात कुशल आणि श्रवण दोघेही गंभीर जखमी झाले.
ही घटना पाहणाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी त्वरीत सायन रुग्णालयात दाखल केले. तर उपस्थितांनी बस चालक निलेश लाटेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील घटनेस जबाबदार असणारी होंडा सिटी कार मात्र तेथून त्वरीत निघून गेली. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून होंडा सिटी कार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यासंदर्भात माटुंगा वाहतूक पोलिस चौकीचे पोलीस निरिक्षक सुनिल कदम यांनी सांगितले की,कार चालकाने कारसह पलायन केले आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत भरधावपणे बस चालकाला मात्र अटक केली आहे.