...तर जनता नेत्यांना घरात घुसून मारेल
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:36+5:302016-04-03T03:51:36+5:30
देशभर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे; त्यामुळे नेत्यांनी वेळीच सावध होऊन कारभार सुधारावा; कारण ही जनता नेत्यांना घरात घुसून अगर रस्त्यात अडवून मारील

...तर जनता नेत्यांना घरात घुसून मारेल
कोल्हापूर : देशभर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे; त्यामुळे नेत्यांनी वेळीच सावध होऊन कारभार सुधारावा; कारण ही जनता नेत्यांना घरात घुसून अगर रस्त्यात अडवून मारील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शनिवारी दुपारी ते कोल्हापुरात आले असताना येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, की देशात कोणतेही सरकार असो; त्यांनी प्रथम देशभर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला निपटून काढले पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीला जनताच कंटाळली आहे. त्यामुळे देशभर क्रांतीची मैदाने तयार होऊ लागली आहेत. नेत्यांनी भ्रष्टाचारी वृत्ती सोडून समाजकार्य दाखवावे; अन्यथा जनता तुम्हाला घरात घुसून अथवा रस्त्यात अडवून मारेल. सध्या भाजप सरकारला अवघी दोनच वर्षे पूर्ण झाली आहेत; त्यामुळे त्यांच्याकडून म्हणाव्या तशा अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत; पण त्यांना पाच वर्षे कारभार करून द्यावा. त्यानंतरच त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे.