... अन् अत्याचाराला फुटली वाचा
By Admin | Updated: March 21, 2015 00:10 IST2015-03-21T00:10:07+5:302015-03-21T00:10:07+5:30
ती शाळेत नेहमी अबोल असायची... घरची गरिबी असतानाही दोन मुलींच्या हातात काही दिवसांपासून पैसे दिसू लागले... मुलींशी चर्चा करताना शाळेतील समुपदेशकांच्या लक्षात ही बाब आली.

... अन् अत्याचाराला फुटली वाचा
पुणे : ती शाळेत नेहमी अबोल असायची... घरची गरिबी असतानाही दोन मुलींच्या हातात काही दिवसांपासून पैसे दिसू लागले... मुलींशी चर्चा करताना शाळेतील समुपदेशकांच्या लक्षात ही बाब आली. मुलींना विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केल्यावर अत्याचाराचे भयाण वास्तव समोर आल्याची माहिती समुपदेशक अनुराधा वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक मारुती सावंत याला शाळकरी मुलींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. शाळेतील समुपदेशकांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ‘लोकमत’ने याविषयी संबंधित समुपदेशक अनुराधा वाघमारे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची अधिक माहिती घेतली. पीडित मुली ज्या शाळेमध्ये शिकतात तिथे वाघमारे या मागील दीड वर्षापासून समुपदेशक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे तेथील मुला-मुलींशी त्यांचा चांगला संपर्क आहे. मुलांशी संवाद साधणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांना विविध प्रकारे मदत करणे हा त्यांच्या कामाचा नित्याचाच भाग आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या वागण्यात झालेला बदल त्यांच्या लगेच नजरेत भरतो. या पीडित मुलींबाबतही असाच बदल त्यांच्या निदर्शनास आला.
याविषयी माहिती देताना वाघमारे म्हणाल्या, की मागील महिनाभरापासून दोन मुलींच्या वागण्यात अचानक बदल दिसून आला. त्यांच्याकडे अचानक पैसे दिसायला लागले. त्या मुली झोपडपट्टीत राहणाऱ्या असल्याने आई-वडील त्यांना पैसे देऊ शकत नव्हते. मात्र, या मुलींकडे नेहमी पैसे असायचे. मागील काही दिवसांपासून याबाबत त्यांना अधून-मधून विचारणा केली जायची. पण त्या सांगत नव्हत्या. मंगळवारी दोन मुलींना पुन्हा विचारले. आई-वडिलांनी पैसे दिले का? पैसे कुठून आले? असे प्रश्न विचारले. पण त्यांनी सुरुवातीला काहीच सांगितले नाही. नंतर समुपदेशनाची काही तंत्रं वापरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भावनिक साद घालण्यात आली. त्या वेळी मुली बोलू लागल्या. त्यातून मग सावंत हा व्यक्ती मुलींना आमिष दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करीत असल्याचे कळले.
सातवीतील मुलगी फारशी बोलत नसायची. सुरुवातीला तिलाही खूप वेळा विचारले. पण ती काहीच बोलत नव्हती. तुला कुणी धमकी दिली आहे का? असे विचारले. खूप वेळाने तिही बोलू लागली. तिला कुणालाही काही न सांगण्याची धमकी त्याने दिली होती. कॉम्प्युटर शिकविण्याच्या बहाण्याने तो
घरी बोलवायचा आणि तिच्याशी अश्लील चाळे करायचा. तिला अश्लील सीडी दाखवायचा. चौथीत असल्यापासूनच सावंत जबरदस्ती करीत असल्याचे त्या मुलीने समुपदेशनादरम्यान सांगितले.
चार मुलींच्या बाबतीत असा गंभीर प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने शाळेतील वरिष्ठ शिक्षकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्या वेळी त्यांनी नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला, असे वाघमारे यांनी सांगितले.
मुलामुलींशी संवाद साधत असताना त्यांच्यात अचानक होत असलेले बदल समुपदेशकांच्या निदर्शनास येतात. हा बदल नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घेत विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. अनेकदा मुली अबोल राहतात. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधावा लागतो. त्यामुळे शाळांमध्ये समुपदेशक असणे महत्त्वाचे ठरते, असे महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये समुपदेशनाचे काम पाहणाऱ्या व्यक्तित्त्व विकास प्रबोधिनी या संस्थेचे समन्वयक पवन गायकवाड यांनी सांगितले. पालिका शाळांमध्ये किमान १०० समुपदेशकांची गरज आहे. सध्या केवळ ५५ समुपदेशक आहेत. जास्त समुपदेशक असल्यास मुला-मुलींशी चांगल्याप्रकारे संवाद साधणे शक्य होईल, असे गायकवाड म्हणाले.
४‘‘एक आजोबा आहेत. त्यांनी आम्हाला चॉकलेट देतो असे सांगून घरी बोलावले. घरात गेल्यावर फुटाणे आणि पैैसेही दिले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा बोलावले. तेव्हाही त्यांनी पैैसे दिले. त्या वेळी त्यांने अश्लील चाळे केले. ते पैैसे देत होते म्हणून आम्ही कुणाला काही सांगितले नाही,’’ असे तीन मुलींनी समुपदेशन करताना अनुराधा वाघमारे यांना सांगितले.
४सातवीतील मुलगी नेहमी शांत असल्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला आईला शाळेत बोलावण्यासही सांगतिले. पण तिने सुरुवातीला काहीच प्रतिसाद दिला नाही.
४इतर तीन मुलींकडून सातवीतील मुलगीही तिथे जात असल्याचे समजले. त्यानंतर या मुलीकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा प्रकार समोर आला, असे अनुराधा वाघमारे यांनी सांगितले.