...अन् गारेगारवाल्याच्या पोरीनं पांग फेडला

By Admin | Updated: November 18, 2014 23:22 IST2014-11-18T21:33:32+5:302014-11-18T23:22:40+5:30

मंजूषा झाली पोलीस : परिस्थितीवर मात करणाऱ्या पोरीचे मुरगूडकरांकडून कौतुक

... and the pigeon's neck pounded | ...अन् गारेगारवाल्याच्या पोरीनं पांग फेडला

...अन् गारेगारवाल्याच्या पोरीनं पांग फेडला

मुरगूड : घरी अठरा विश्व दारिद्र्य, गुंठाभर जमीन नाही, अशा दयनीय परिस्थितीत शिक्षणाची दारे केव्हाच बंद झालेली. त्यामुळेच कुटुंबाला आधार देण्यासाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मुरगूड शहरातील गल्ली-बोळांतून ‘गार गार गारेगार’, ‘घ्या बर्फाचा गोडगोड गोळा’ अशी साद घालत गारेगार विक्रीचा व्यवसाय करणारा आण्णाप्पा.
पै-पै मिळवून मुलगा उत्तम आणि मंजूषा यांना शिकवायचेच, अशी जिद्द मनाशी बाळगल्याने होणाऱ्या कष्टाची झळ त्यांना कधी बसलीच नाही; पण रोज सकाळी लवकर गारेगारचा गाडा ढकलत निघालेल्या वडिलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मंजूषाचे डोळे भरून यायचे. कधी संपतील हे बाबांचे कष्ट, असा विचार तिच्या मनात यायचा. त्यामुळे मनापासून ती अभ्यास करायची.
येथील शिवराज विद्यालयामध्ये बारावीत ती यशस्वी झाली आणि पोलीस दलातील पूर्वपरीक्षेची तयारी सुरू केली. कॉलेजचे प्राचार्य महादेव कातकेकर यांनी तिला मैदानी खेळांचे मार्गदर्शन, तर सुनील शेलार यांनी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले.
कोल्हापूर येथील पोलीस मैदानावर ज्यावेळी ती चाचणी देण्यासाठी उतरली, तेव्हा ती धावण्याच्या चाचणीमध्ये चक्कर येऊन कोसळली; पण मनाशी बाळगलेली जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती. वडिलांचा चेहरा कायम समोर दिसत होता. ती पुन्हा धाडसाने उभी राहिली. यशस्वी चाचणी देऊन घरी परतली.
मैदानाच्या चाचणीत चांगले गुण मिळाले; पण अद्याप नावावर शिक्कामोर्तब झाला नव्हता. त्यामुळे मनाला हुरहुर होती. एकेदिवशी तिला वैद्यकीय चाचणीसाठी पत्र आले आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.
कोल्हापूरला जाऊन वैद्यकीय चाचणी देऊन येताना भरती झाल्याबाबतचे पत्र घेऊनच ती घरी परतली. ज्यांच्यामुळे तिला प्रेरणा मिळाली, लढायचं बळ मिळालं,
त्या आण्णाप्पांच्या पायावर तिनं डोकं ठेवलं. त्यावेळी तिच्यासह आण्णाप्पांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू आले. मंजूषाच्या यशाने साऱ्यांनाच अभिमान वाटला. म्हणतात ना, प्रज्ञावंत, गुणवंत
माणसे जन्मालाच यावी लागतात. याची प्रचिती मंजूषाच्या यशामुळे आली.

पै-पै गोळा करून मुलीला शिकवायचेच, असा चंगच आण्णाप्पाने बांधला होता. वडिलांचे हाल-अपेष्टा मंजूषा जवळून पाहत होती. तिनेही शिकायचे अन् जिद्दीने, या कष्टांच्या पै-पैचं ऋण फेडण्यासाठी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. काही दिवसांपूर्वी ती महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली अन् साऱ्या मुरगूड शहरात ‘आण्णाप्पा गारेगारवाल्याच्या पोरीनं पांग फेडला’ असे कौतुक होऊ लागले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मंजूषाने मिळविलेल्या या यशाचे कौतुक करण्यासाठी सारे शहर सरसावले. सर्वत्र डिजिटल फलक लावून तिचे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: ... and the pigeon's neck pounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.