...तर माझाही कन्हैया होईल : नाना पाटेकर
By Admin | Updated: April 9, 2016 09:35 IST2016-04-09T01:36:48+5:302016-04-09T09:35:54+5:30
मी नट म्हणून बोललो की, माझा कृष्ण म्हणून गौरव होतो, तेच मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोललो तर माझा कन्हैया होईल. जागा बदलली की भूमिका बदलते.

...तर माझाही कन्हैया होईल : नाना पाटेकर
पुणे : मी नट म्हणून बोललो की, माझा कृष्ण म्हणून गौरव होतो, तेच मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोललो तर माझा कन्हैया होईल. जागा बदलली की भूमिका बदलते. एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याचे होणारे परिणाम भोगण्याची तयारी आमच्याकडे नाही, त्यामुळे आपण ठाम भूमिका घेत नाही. ठाम भूमिका घेऊन त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
अच्युत गोडबोले व नीलांबरी जोशी यांनी विदेशी चित्रपटसृष्टीवर लिहिलेल्या ‘लाइमलाइट’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर उपस्थित होते.
नाना पाटेकर म्हणाले, ‘‘मराठवाडा, खान्देश, विदर्भात फिरल्यानंतर माझी दु:खाची व्याख्या बदलली. पाणी, वीज या मूलभूत गोष्टीही आपण त्यांना देऊ शकलेलो नाही. त्यांना वंचित ठेवणे ही काहींची गरज असल्यामुळे कदाचित असे घडले असेल. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांनी आतापर्यंत ३० कोटी रुपयांची मदत केली आहे. यातून विधवा महिलांना मदतीचे धनादेश देण्याची तात्पुरती मलमपट्टी केली. त्याचबरोबर ३६५ किलोमीटर नदीपात्र विस्तीर्ण करण्याचे काम यातून करण्यात आले. शासकीय यंत्रणेला हेच काम करण्यास अनेक वर्षे लागली असती. अच्युत हा लिहिण्यापेक्षा सांगतो. गोष्ट सांगितल्याप्रमाणे तो पुस्तकातून लिहितो. त्यामुळे त्याचे लिखाण वाचायला कंटाळा येत नाही, ते बोजड वाटत नाही अशा शब्दांत पाटेकर यांनी अच्युत गोडबोले यांचा गौरव केला.
जब्बार पटेल म्हणाले, ‘‘जगात वेगळे काही करणाऱ्या मंडळींवर हे पुस्तक लिहिले आहे. विदेशी चित्रपटाला सर्वांगीण स्पर्श करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा नाना आणि बिहारमधील लोकांच्या मदतीसाठी धावून येणारा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅन्डो यांचे नाते असल्याचे दिसून येते.’’
अच्युत गोडबोले यांनी सांगितले, ‘‘विदेशी साहित्य, चित्रपट, संगीत यावर लिहिण्याचा मानस केला होता. त्यानुसार साहित्यावर झपुर्झाचे दोन भाग लिहिले. त्यानंतर चित्रांवर कॅनव्हास लिहिले. चित्रपटांविषयी लाइमलाइट या पुस्तकांमध्ये सविस्तर मांडणी केली आहे.’’ (प्रतिनिधी)