अन् मनात दडलेले भूत उतरून पळाले
By Admin | Updated: November 18, 2014 00:55 IST2014-11-18T00:55:49+5:302014-11-18T00:55:49+5:30
चमत्कारालाच नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे भारतात ढोंगीबाबांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानवी मनात खोलवर रुजल्या आहेत.

अन् मनात दडलेले भूत उतरून पळाले
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती : श्याम मानव यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : चमत्कारालाच नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे भारतात ढोंगीबाबांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानवी मनात खोलवर रुजल्या आहेत. परंतु एखादा बाबा हवेत हात फिरवून कुठलीही वस्तू कशी निर्माण करतात, आपल्या मंत्रोच्चाराने अग्नी कसा प्रज्वलित करता येतो. इतकेच नव्हे तर एखाद्याच्या अंगात शिरलेले भूत कसे उतरविण्याचे सोंग केले जाते, हे अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी आज प्रात्यक्षिकांसह सादर करून दाखविले. श्याम मानवांचे प्रबोधन आणि त्यांचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक पाहिल्यावर उपस्थित नागरिकांच्या मनातील भूतसुद्धा उतरून पळाले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाजकल्याण आयुक्तालयाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्यावतीने सोमवारी हिंदी मोरभवन येथे अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आणि समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. आ. नागो गाणार, प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त आर.डी. आत्राम, सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, सुरेश झुरमुरे आणि हरीश देशमुख व्यासपीठावर होते.
प्रा. श्याम मानव यांनी सुरुवातीलाच सत्यसाईबाबा कशाप्रकारचे चमत्कार करून दाखवीत होते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि त्यामागील हातचलाखीही सांगितली. हवेतून सोन्याची चेन काढणे, सोन्याची अंगठी निर्माण करणे, यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करणे आणि त्यामागील हातचलाखी समजवून सांगताच उपस्थितांच्या मनातील अनेक गैरसमज दूर झाले. इतकेच नव्हे तर काही लहान मुलांना व्यासपीठावर बोलावून भूत कसे काढले जाते, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. एका तांब्याच्या गडव्यामध्ये तांदूळ भरून त्यात एक त्रिशूळ टाकून संपूर्ण तांबा उचलल्या गेला. यामागील विज्ञान समजावून सांगितला. तसेच चिमुकल्यांकडूनही ते करवून घेतले. एकूणच छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रा. श्याम मानव यांनी चमत्कार व अंधश्रद्धा दूर केली. शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा नेमका काय सांगतो, हे सविस्तर समजावून सांगितले. तसेच जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. पंजाबराव वानखेडे यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात वर्धेतील नरबळी प्रकरणाचा उल्लेख करीत जादूटोणा विरोधी कायद्याची किती गरज निर्माण झाली आहे, याचे महत्त्व पटवून दिले. कायद्याबाबत जागृती नसेल तर कुठलाही कायदा प्रभावीपणे अमलात येऊ शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आर.डी. त्राम, उमेश चौबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरेश झुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
पोलिसांना देणार प्रशिक्षण
जादूटोणा विरोधी कायद्याबाबत संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून प्रा. श्याम मानव यांच्या ३५ जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहेत. यानंतर प्रत्येक शाळांमध्ये जागृती करण्यात येईल. हा कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना दक्षता अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे, त्यामुळे त्यांना या कायद्याची संपूर्ण जाणीव व्हावी, या उद्देशाने त्यांना कायद्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.