...आणि उमाताई झाल्या स्तब्ध
By Admin | Updated: March 3, 2015 02:17 IST2015-03-03T02:17:05+5:302015-03-03T02:17:05+5:30
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी त्यांच्या पत्नी उमातार्इंना समजताच त्या ‘स्तब्ध’ झाल्या.

...आणि उमाताई झाल्या स्तब्ध
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी त्यांच्या पत्नी उमातार्इंना समजताच त्या ‘स्तब्ध’ झाल्या. अण्णांच्या निधनाच्या धक्क्यामुळे काही काळ त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी रविवारी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितले.
अण्णांना उमातार्इंनी आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या पानसरे अण्णांबरोबरच आपल्या अंगावर त्यांनी झेलल्या. अण्णांचे निधन झाल्याचे कसे सांगायचे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाची माहिती दिली नव्हती.
दहा दिवसांपासून उमातार्इंची प्रकृती दिवसागणिक सुधारत आहे. त्यांना व्हीलचेअरवरूनही फिरविण्यात येत आहे.
त्या बोलू लागल्यानंतर प्रत्येक दिवशी साहेबांची तब्येत बरी
आहे ना, त्यांची काळजी घ्या, असे त्यांना भेटणाऱ्या नातेवाईक आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्या सांगत होत्या.
रविवारी अण्णांच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपल्या बहिणींजवळ अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी सोमवारी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाबाहेर मोकळ्या जागेत व्हीलचेअरवरून फेरी मारली. (प्रतिनिधी)
पानसरेंवरील चर्चा लोकसभेत थांबली
नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर महाराष्ट्रात पुढचे लक्ष्य कोल्हापूरचे अॅड. पानसरे असतील, असा आयबीचा अहवाल होता. तरीही सरकारने पानसरे यांना सुरक्षा पुरविली नाही. आता तिसऱ्या टार्गेटची चर्चा सुरू आहे, असे राजीव सातव यांनी लोकसभेत शून्य प्रहरात म्हटले. त्या वेळी राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले, हा विषय गंभीर आहे. पण राज्याशी संबंधित असल्याने तो लोकसभेत उपस्थित करू नये. यावर सातव यांनी रुडी यांना राज्याशी संबंधित पण लोकसभेत चर्चा झालेले पूर्वीचे काही विषय सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रुडी म्हणतात ते योग्य आहे, असे सांगून विषय थांबविला. (विशेष प्रतिनिधी)