मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आज महत्वपूर्ण बैठक
By संदीप बांद्रे | Updated: March 13, 2023 13:04 IST2023-03-13T13:03:43+5:302023-03-13T13:04:11+5:30
संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी १२ मार्च रोजी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली होती.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आज महत्वपूर्ण बैठक
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामातील प्रगतीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. १३) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी १२ मार्च रोजी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानुसार ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे मुख्य प्रवक्ते ॲड. ओवेस पेचकर यांनी दिली.
मंत्रालयातील समिती सभागृहात ही बैठक सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामाबाबत ओरड होऊ लागली आहे. काम पूर्ण करण्याच्या तारखा वारंवार बदलत असून, आता डिसेंबर २०२३पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत ॲड. ओवेस पेचकर यांनी न्यायालयात याचिकाही दखल केली आहे. तसेच महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने भेट घेतली होती. मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासंदर्भात अधिवेशनात यावर सखोल चर्चा करावी तसेच अधिवेशनात लक्ष वेधण्यासाठी 20 मार्च 2023 रोजी काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश आंदोलनबाबत माहिती दिली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.