Happy Birthday Devendra Fadnavis : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही वाढदिवस आजच्याच दिवशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाच्या ५६व्या वर्षात प्रवेश केला. राज्याला लाभलेले विकासाभिमुख सक्षम नेतृत्व, उत्तम प्रशासक, कार्यतत्पर मुख्यमंत्री अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चहुबाजुंंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शुभेच्छांमध्ये मिसेस मुख्यमंत्री म्हणजे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेली पोस्ट आणि फोटो विशेष चर्चेत आहे.
अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीसांना कायम साथ देत असतात. दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता आहे म्हणूनच दोघेही एकमेकांना हवे असलेले काम करण्याचे स्वातंत्र्य देतात, असे फडणवीस दाम्पत्याने एका मुलाखतीत सांगितले होते. आज आपल्या पतीच्या वाढदिवशी अमृता फडणवीस यांनी एक विशेष पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. "देवेंद्र फडणवीसजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही लोकांसाठी समर्पित असे जीवन जगत राहा, ज्यामुळे लोकांचे कल्याण होईल. तुम्हाला नेहमीच लोकांकडून भरभरून प्रेम मिळत राहो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच, या पोस्टमध्ये त्यांनी फडणवीस कुटुंबाचा फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी २००५ साली लग्न झाले. त्या बँकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. अमृता फडणवीस यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असतो. अनेक कार्यक्रमांना त्या हजेरी लावताना दिसतात. तसेच त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.