अमरावतीचे महापौरपद खोडके गटाकडे
By Admin | Updated: September 10, 2014 00:44 IST2014-09-10T00:44:38+5:302014-09-10T00:44:38+5:30
अमरावती महानगरपालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा यांची सरशी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने

अमरावतीचे महापौरपद खोडके गटाकडे
राष्ट्रवादीला ठेंगा : उपमहापौरपदासाठी काँग्रेसची राष्ट्रवादी फ्रंटशी हातमिळवणी
अमरावती : अमरावती महानगरपालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा यांची सरशी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला दूर ठेवत खोडके यांच्याशी हातमिळवणी केल्याने उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार विजयी झाले आहेत. त्यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपना ठाकूर व शिवसेना - भाजपच्या छाया अंबाडकर यांचा पराभव केला. जनविकास काँग्रेस- जनकल्याण आघाडीचे नगरसेवक तटस्थ राहिले.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ८७ पैकी ७९ नगरसेवकांनी मतदान केले. आठ नगरसेवक तटस्थ राहिले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ७१ नगरसेवकांनी मतदान केले. त्यावेळी मात्र, जनविकास काँग्रेसचे बाळू भुयार, काँग्रेस आघाडीतील अपक्ष नगरसेवक विजय नागपुरे हे सभागृहात अनुपस्थित होते. मात्र, विजय नागपुरे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सपना ठाकूर यांच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. तथापि, मतदान रजिस्टरवर स्वाक्षरी करायला त्यांनी नकार दिला. बहुजन समाज पार्टीच्या ६ नगरसेवकांमध्ये फूट दिसून आली. त्यापैकी ३ नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या बाजूने महापौर, उपमहापौरपदासाठी मतदान केले. भाजप गटात सामील अपक्ष नगरसेवक दिनेश बूब हे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिले.
मंगळवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पीठासीन अधिकारीपद भूषविले.
महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर नंदा यांना ४७, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपना ठाकूर यांना ८, शिवसेना- भाजप, रिपाइं महायुतीच्या रेखा तायवाडे यांना २१, बसपाच्या गुंफाबाई मेश्राम यांना ३ मते मिळाली.
चरणजित कौर नंदा यांना विजयी घोषित करण्यात आले.तसेच उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या छाया अंबाडकर यांना २१ मते, काँग्रेचे शेख जफर यांना ४७ मते तर बसपाचे दीपक पाटील यांना तीन मते मिळाली. महापौरपदासाठी चार तर उपमहापौरासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.