अमरावतीच्या चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर गावातून अत्यंत चिंताजनक बाब समोर आली. पॉर्न व्हिडीओ पाहण्यापासून रोखले आणि मोबाईल विकला म्हणून दोन मुलांनी स्वतःच्याच वडिलांवर हल्ला केला. याप्रकरणी उमेश मोगू दांडीले (वय, ४५) यांनी त्यांचे दोन्ही मुले सुमित दांडीले (वय, १९) आणि अमित दांडीले (वय, १८) यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी उमेश दंडोले यांनी त्यांचे मुले सुमित आणि अमितला मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहताना बघितले. त्यावेळी उमेश यांनी प्रथम दोघांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना मारहाणही केली. तसेच मोबाईलही विकला. त्यामुळे दोन्ही मुलगे संतापले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांविरुद्धचा राग मनातच ठेवला.
घटनेच्या दिवशी उमेश घरी परतताच सुमित आणि अमित यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. दोघांनी मिळून उमेश यांना जमिनीवर पाडले. त्यावेळी सुमितने उमेश यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत उमेश यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उमेश यांनी आपल्या दोन्ही मुलांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोकही स्तब्ध झाले. मोबाईल आणि इंटरनेटच्या व्यसनामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता कशी येऊ शकते आणि गुन्हेगारी कशी निर्माण होऊ शकते? असे गंभीर प्रश्नही समाजासमोर उभे ठाकले आहेत.