मिहानमध्ये अमेरिकन गुंतवणूक!

By Admin | Updated: December 17, 2014 00:36 IST2014-12-17T00:36:41+5:302014-12-17T00:36:41+5:30

महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रकिया आणि उद्योगस्नेही वातावरणाची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

American investment in Mihan! | मिहानमध्ये अमेरिकन गुंतवणूक!

मिहानमध्ये अमेरिकन गुंतवणूक!

उद्योजक उत्सुक : उद्योगस्नेही वातावरणाची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नागपूर : महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रकिया आणि उद्योगस्नेही वातावरणाची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अमेरिकेचे महावाणिज्यदूत थॉमस वाडा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील २२ प्रमुख उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची रामगिरीवर भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व सुविधायुक्त मिहानमध्ये आणि महाराष्ट्रात कुठेही उद्योग उभारण्याचे आवाहन त्यांना केले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चेला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव (साप्रवि) पी.एस. मीना, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) सुमित मलिक, अप्पर मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव (उद्योग) अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी, महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे अमेरिकेबरोबरच सर्व जगातील गुंतवणूकदारांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. रस्ते, रेल्वे, हवाई, बंदरे अशा सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा महाराष्ट्रात आहेत. मात्र उद्योग सुरू करताना ज्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात, त्यांची संख्या आणि त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्र्यांचा समावेश असलेली एक आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दुसरी अशा दोन उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या व असलेल्या उद्योगांचा विस्तार करणाऱ्या सर्व उद्योगांचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी एपीसीओचे सुकांती घोष, आशिष दुबे, अ‍ॅमाझॉनचे मोहित बन्सल, बेकटॉन वरुण खन्ना, बोर्इंगचे प्रत्युषकुमार, हिंदुस्थान कोका-कोलाचे प्रसाद शिवलकर, कोलगेटचे नीलेश घाटे, कॉर्निंगचे रूस्तुम देसाई, डाटा कार्डचे राजीव सिंग, ऐजवुडचे विशाल वर्मा, जनरल मोटर्सचे पी. बालेंद्रन, हनीवेलचे वरुण जैन, जेबील सर्किटचे अनुपकुमार, मेहरोत्रा, सुनील नाईक, व्ही.व्ही. नाईक, कॅटरपिल्लरचे जावेद अहमद, आरजीपीचे महेश कृष्णमूर्ती, वरियन मेडिकलचे गिरीधरन अय्यर, वॉलमार्टचे क्रिश अय्यर व रजनीश कुमार, अ‍ॅमकेमचे अजय सिंघा, सुरभी वाहेल आदी उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘मेक इन महाराष्ट्र’मुळे उद्योजक प्रभावित
यावेळी उद्योगसमूहाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा आपला अनुभव अतिशय समाधानकारक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ‘मेक इन महाराष्ट्र’संदर्भात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याबाबत जे निर्णय घेतले, त्याबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यात आता अधिक स्वारस्य निर्माण झाल्याचे सर्र्वांनी आवर्जून सांगितले.

Web Title: American investment in Mihan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.