मेडिकलमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा

By Admin | Updated: October 27, 2014 00:31 IST2014-10-27T00:31:49+5:302014-10-27T00:31:49+5:30

‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र अनेक चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआमपणे लूट चालविली आहे. यामुळे गरीब

Ambulance collapse in medical | मेडिकलमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा

मेडिकलमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा

नागपूर : ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र अनेक चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआमपणे लूट चालविली आहे. यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना गंभीर रुग्ण इस्पितळात घेऊन जाण्यासाठी किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेणे जिकरीचे झाले आहे. दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून या चालकांना रोखणारे कुणीच नाही, यामुळे त्यांनी रुग्णांची पळवापळव करणे पुन्हा सुरू केले आहे.
सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला अ‍ॅम्ब्युलन्सचा धंदा नागपुरात इतर व्यवसायाप्रमाणेच बहरला आहे. अमर्याद कमाईमुळे अनेकजण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. सर्वसाधाण चालकापासून भंगारवाल्यांपर्यंत, तसेच विविध पक्ष, संघटनांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. खासगी अ‍ॅम्ब्युलन्सचा मोठा तळ मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयाच्या परिसरात आहे. या अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर या रुग्णालय प्रशासनाने मेहेरनजर दाखविल्याचे दिसून येत आहे.
रुग्ण पळवून नेण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची मदत
दरम्यानच्या काळात मेडिकलमधून रुग्णांना पळवून नेणाऱ्यांवर वचक बसला होता. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी स्वत: यात पुढाकार घेऊन अशा अनेक दलालांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु आता याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे पुन्हा कमिशनच्या लोभापोटी मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांना भीती दाखवून विशिष्ट खासगी इस्पितळात पळवून नेले जात आहे. यात संबंधित एजंट अ‍ॅम्बुलन्स चालकाच्या मदतीने हे काम तडीस नेत आहेत.
गंभीर रुग्णांकडेही असते त्यांचे लक्ष
कुठल्या वॉर्डात किती रुग्ण गंभीर आहेत, व्हँटिलेटरवर किती आहेत, बर्निंग वॉर्डात उपचार घेत असलेल्या व शंभर टक्के जळालेल्या रुग्णाची तब्येत कशी आहे, याची माहिती अ‍ॅम्बुलन्स चालक व त्यांचे एजंट वॉर्डावॉर्डात फिरून घेतात.
रुग्णाचे निधन झाल्यावर आपल्यालाच धंदा मिळावा, यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाशी जवळीक साधण्याचे ते प्रयत्न करतात. रुग्णाचा मृत्यू होताच माफक दरात गावाला घेऊन जाण्याच्या नावाखाली काही चालक मनमानीपणे पैशाची वसुली करतात.
दरफलक नसल्यामुळे मनमानी
एखादा अ‍ॅम्ब्युलन्स चालक ५० कि.मी.अंतरावरील गावात जाण्यासाठी दोन हजार रुपये घेत असेल तर दुसरा १२०० रुपयांत तयार होतो.
यावरून अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचे दर निश्चित नसतात. अ‍ॅम्ब्युलन्ससाठीचे दरफलक पार्किंगच्या ठिकाणी लावल्यास मृताच्या नातेवाईकांची लूट होण्याचे प्रमाण कमी होईल. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डिझेल भरून येतो असे सांगून मृताच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन पसार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
अ‍ॅम्ब्युलन्सची उपयुक्तता
आरोग्य सेवेत अ‍ॅम्ब्युलन्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्यसरकारने अ‍ॅम्ब्युलन्सला रोड टॅक्समधून सवलत दिली आहे.
रुग्णाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहचता यावे यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला सायरन वाजविण्याची मुभाही देण्यात आली आहे. अ‍ॅम्ब्युलन्सवर निळ्या रंगाचा दिवा असतो.
वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांना थांबण्याची सक्ती नसते. कुठल्याही प्रकारचा टोल त्यांना लागू नसतो. अशा अनेक सोयी त्यांना दिल्या जातात, मात्र याचा गैरफायदाच घेत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Ambulance collapse in medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.