मालाड—कांदिवलीतील आंबेडकर अनुयायींचे मोर्चे
By Admin | Updated: July 4, 2016 02:32 IST2016-07-04T02:32:45+5:302016-07-04T02:32:45+5:30
आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी मालाड—कांदिवलीमध्ये आंबेडकर अनुयायींनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला.

मालाड—कांदिवलीतील आंबेडकर अनुयायींचे मोर्चे
मुंबई : आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी मालाड—कांदिवलीमध्ये आंबेडकर अनुयायींनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांनी या वेळी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली. पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी नागसेन सोनारे यांच्या कांदिवलीतील घरावर मोर्चा नेण्यात आला.
मोर्चामध्ये समतानगर पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल, साध्या वेशातील पोलीस आणि सहायक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांची उपस्थिती होती. या मोर्चाचे आयोजन भारिप बहुजन महासंघ कांदिवली, दहिसर तालुका भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध लेणी संवर्धन समिती आदींनी केले होते; तर दुसरीकडे मालाड येथे गेट नंबर ८ अंबूजवाडी येथून गेट नंबर ५ मालवणी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. रत्नाकर गायकवाड यांचे निषेध करणारे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते.
गायकवाड यांना अटक करण्याच्या या मागणीचे निवेदन मालवणी पोलिसांना देण्यात आले. हा मोर्चा बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीचे मालाड तालुकाध्यक्ष सुनील खरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. गायकवाड यांना अटक न झाल्यास मंत्रालयात घुसून आंदोलनाचा इशारा बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीचे अध्यक्ष श्याम झळके यांनी दिला. (प्रतिनिधी)
३५ जण समतानगर पोलिसांच्या ताब्यात
कांदिवलीत काढलेल्या मोर्चातील ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले. यात महिलांचाही समावेश आहे. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर समज देत या सर्वांना सोडून देण्यात आल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.