श्रमदानातून पुन्हा त्याच जागी आंबेडकर भवन उभारणार !

By Admin | Updated: July 20, 2016 06:09 IST2016-07-20T06:09:30+5:302016-07-20T06:09:30+5:30

३० जुलैपासून श्रमदानातून वास्तू उभारणार असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली

Ambedkar Bhaban will be rebuilt from the place of labor! | श्रमदानातून पुन्हा त्याच जागी आंबेडकर भवन उभारणार !

श्रमदानातून पुन्हा त्याच जागी आंबेडकर भवन उभारणार !


मुंबई : दादर येथील आंबेडकर भवनची वास्तू नष्ट करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच ठिकाणी ३० जुलैपासून श्रमदानातून वास्तू उभारणार असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ काढलेल्या सर्वपक्षीय महामोर्चाचे रूपांतर छत्रपती शिवाजी टर्मिनसमोरील चौकात जाहीर सभेत झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार आणि शोषितांच्या चळवळीचे केंद्र म्हणून ही वास्तू उभारली होती. हे चळवळीचे केंद्र जीवंत असल्याचे दाखवण्यासाठी सर्वांनी ३० जुलैला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. सकाळी १० वाजेपासून वास्तू उभारण्याच्या कामाला सुरुवात होईल. अवघ्या आठवडाभरात वास्तू उभी करून, चळवळीचे केंद्र जीवंत असल्याचे दाखवून देऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा जात आणि धर्माच्या आधारावर आहे. त्यामुळे एका मोर्चाने हा लढा संपणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही मशाल तेवत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाहीचा आधार घेऊनच हिटलरही सत्तेवर आला होता. मात्र त्याने लोकनेते आणि राजकीय पक्ष नष्ट करून हुकूमशाही स्थापन केली. अशीच वाटचाल देशात होत आहे. येथील विचार केंद्रे संपवली जात आहेत. त्याविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
लाल - निळीशक्ती एकत्र
खा. सीताराम येचुरी यांनी राज्यसभेत आंबेडकर भवनची वास्तू जमीनदोस्त केल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ते दिल्लीहून विमानाने मुंबईला मोर्चात सामील होण्यासाठी आले. आजच्या लढ्यात निळ््या शक्तीसोबत लालशक्ती एकत्र आली असून त्यामध्येच संपूर्ण जग सामावलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा
शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. नीलम गोऱ्हे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीने एकत्र येण्याचे आवाहन केले. आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर खुर्चीवर बसवलेल्यांना खाली खेचू, असा इशाराही त्यांनी दिला.
कन्हैय्याकुमारचे टीकास्त्र
आंबेडकर भवनची वास्तू पाडल्यावर केंद्र शासन हा कायदेशीर मुद्दा असल्याचे कारण देत आहे. प्रत्यक्षात हा मुद्दा कायदेशीर नसून, ही संघिस्तानविरोधात हिंदुस्थान अशी लढाई आहे. त्यात हिंदुस्तानचाच विजय होईल, असा विश्वास जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्याकुमार याने व्यक्त केला. इतिहास संपवण्यासाठी आंबेडकर भवनची ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्यात आली. मात्र त्यामागील चळवळ आणि विचार संपू देणार नाही. उद्या मुंबई महानगरपालिका, सीएसटी किंवा ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू पाडून नव्या इमारती उभारणार का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्याचे नाटक करून समरसतेच्या गोष्टी ते बोलत आहेत. मात्र बाबासाहेबांनी समता स्थापित करण्याचे आवाहन केले होते. समतेशिवाय समरसता स्थापित होऊ शकत नाही, हेच त्यांना कळालेले नाही, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला.
बाबासाहेबांचे विचार जो वाचेल, तो रोहित बनेल आणि जर सर्व रोहित झाले, तर संघ कसा चालेल, अशा शब्दांत कन्हैय्याकुमारने संघाला टोला लगावला. हजारो आंबेडकरी समुदाय कन्हैय्यासोबत ‘आझादी’च्या घोषणेत सहभागी झाला होता. (प्रतिनिधी)
देखणे आंंबेडकर भवन त्याच जागी पुन्हा बांधू - केंद्राची ग्वाही
नवी दिल्ली : स्वातंत्र्य लढ्यासह दलित चळवळींचे केंद्र राहिलेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाचा ऐतिहासिक वारसा सांगणारी मुंबईतील आंबेडकर भवन ही पाडली गेलेली वास्तू, त्याच जागेवर अधिक देखण्या स्मारकाच्या स्वरूपात नव्याने उभी करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने मंगळवारी दिले.
आंबेडकर भवन गेल्या महिन्यात जमीनदोस्त करण्यात आले. या घटनेवर संताप व्यक्त करीत राज्यसभेत मार्क्सवादी, बसपा व काँग्रेस सदस्यांनी ही वास्तू पुन्हा पूर्ववत उभी करा, अशी एकमुखी मागणी केली. त्यावर महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून ही वास्तू पुन्हा त्याच जागेवर उभी करण्यात येईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सहलीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी स्पष्ट केले. शून्यप्रहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना म्हणाले की, अलौकिक विचारांची मुहूर्तमेढ ज्या ऐतिहासिक वास्तूत डॉ. आंबेडकरांनी रोवली, त्या वास्तूला राज्य सरकारच्या अनुमतीने महापालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले, ही अतिशय गंभीर बाब आहे.
>...तर जनता कायदा हातात घेईल
आंबेडकर भवन पाडण्यात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीही या प्रकरणात सामील असल्याची शंका येते. तत्काळ कारवाई न केल्यास जनता कायदा हातात घेईल, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
>भीमसागर उसळला
दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ दादर येथून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या महामोर्चाचे रूपांतर छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील चौकात जाहीर सभेत झाले.
>सर्वपक्षीयांची हजेरी
मोर्चामध्ये भारिप बहुजन महासंघासोबत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, एआयएमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, आ. वर्षा गायकवाड, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कानगो, अर्जुन डांगळे आदी सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटकमधूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते.
केंद्र सरकारचीही ग्वाही
डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाचा ऐतिहासिक वारसा सांगणारे आंबेडकर भवन अधिक देखण्या स्वरूपात नव्याने उभारण्याचे आश्वासन केंद्र सरकारने मंगळवारी दिले. 

Web Title: Ambedkar Bhaban will be rebuilt from the place of labor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.