अंबाबाईचे खरे रूप प्रकाशात--- ‘लोकमत’चे अभिनंदन :

By Admin | Updated: September 26, 2014 21:15 IST2014-09-26T21:15:19+5:302014-09-26T21:15:19+5:30

मंदिराचे दाक्षिणात्यीकरण थांबविण्याची वाचकांची अपेक्षा --महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय !

Ambabai's true form in light - Congratulations to 'Lokmat': | अंबाबाईचे खरे रूप प्रकाशात--- ‘लोकमत’चे अभिनंदन :

अंबाबाईचे खरे रूप प्रकाशात--- ‘लोकमत’चे अभिनंदन :

कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई ही आद्यशक्ती, आदिमाया आहे. तिने कोल्हासुरासह असुरांचा वध करून प्रजेला सुखसमृद्धी दिली. अंबाबाईच्या कृपेमुळे बालाजीला आपल्या पत्नीची पुनर्प्राप्ती झाली आणि तिरूमला देवस्थान निर्माण झाले. असा अंबाबाईचा अलौकिक महिमा आहे. मात्र, अज्ञानातून या देवीला विष्णुपत्नी समजून मंदिराचे आणि कोल्हापूरचे केले जाणारे दाक्षिणात्यीकरण थांबावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
‘लोकमत’मध्ये ‘महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय’ या नावाने देवीचे खरे रूप पुन्हा एकदा प्रकाशात आणणारी सहा भागांची मालिका प्रसिद्ध झाली होती. या मालिकेला वाचकांनी आणि भाविकांनी दूरध्वनी व पत्रांद्वारे उदंड प्रतिसाद दिला. मंदिरातील धार्मिक विधींचे होत असलेले दाक्षिणात्यीकरण, बदलत चाललेल्या पद्धती आम्हाला खटकत होत्या. अंबाबाईची ‘महालक्ष्मी’ झाली. त्यापुढे जाऊन या देवीला विष्णुपत्नी बनविणे, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हा विषय केली कित्येक वर्षे खदखदत होता. त्याला वाचा फोडण्याचे धाडस ‘लोकमत’ने केले, अशा भावना व्यक्त केल्या. त्यांतील काही निवडक प्रतिक्रिया आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. (प्रतिनिधी)

देवीचा अवमानच...
मंदिरात गेल्या काही वर्षांपासून नव्याने सुरू झालेल्या पद्धतीबाबत बऱ्याच मंडळींची नाराजी होती. ज्या आदिशक्तीच्या आराधनेने विष्णूला आपली बायको परत मिळाली, त्या देवीचा पत्नी म्हणून चुकीचा प्रसार करणे हा एकप्रकारे देवीचा अवमानच आहे. याबाबत जागृती करणे आवश्यक होते. देवीचे सत्य प्रकाशात आणण्याचे धाडस ‘लोकमत’ने केले. आता नागरिकांनीही चुकीच्या गोष्टींचा प्रसार थांबवायला हवा; नाही तर देवीचा इतिहास पुसला जाईल.
- बाबा देसाई
संस्कृतीचे अतिक्रमण
‘महालक्ष्मी की अंबाबाई?’ या संदर्भात जाणकारांशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळते की, ही देवी शाक्त संप्रदायानुसार आद्यशक्तीच आहे. सध्या तिरूपती येथील पूजाअर्चा, तेथील पद्धती व भाषाशैली येथे अवलंबली जात आहे, ते चुकीचे आहे. हे म्हणजे संस्कृतीचे संक्रमण होण्याऐवजी संस्कृतीचे अतिक्रमणच आहे.
- युवराज कदम
खरे स्वरूप झाकोळले
जगदंबा असलेल्या आदिशक्तीला विष्णुपत्नी संबोधून या देवीचे खरे स्वरूप विस्मृतीत ढकलण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. कोल्हासुराचा वध करणारे हे शक्तिपीठ केवळ एका देवतेची पत्नी म्हणूनच जास्त प्रसिद्ध होत आहे, हे खरेही नाही आणि योग्यही नाही. मंदिरातील परंपरा, उत्सव आणि देवीच्या नावाने काम करणाऱ्या संस्थांनीदेखील हे दाक्षिणात्यीकरण थांबवावे.
- आशुतोष भडसावळे

शीलालेखातली अंबाबाई
पुराणांत व ग्रंथांत जसे अंबाबाईचे उल्लेख आले आहेत, तसेच ताम्रपट व शीलालेखांतही आहेत. हे शक्तिपीठ शिवक्षेत्रात वसलेले आहे. ही देवता महापातकविनाशिनी असून रुद्राची अर्धांगिनी, सिंहवाहिनी, देवगणांच्या आद्यस्थानी आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, वातापीचे वालुक्य, कल्याणीचे चालुक्य, शीलाहार या राजवंशांची सत्ता या स्थानावर होती. त्यांनी अंबाबाईची मनोभावे आराधना केली.
- शुभम शिरहट्टी
(विद्यार्थी, प्रायव्हेट हायस्कूल )

वाचा फुटली
या विषयाला वाचा फुटावी, असे बऱ्याच दिवसांपासून वाटत होते. ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेऊन अंबाबाईचा इतिहास बदलणाऱ्यांना चाप बसविला आहे. मंदिराच्या रचनेवरून ही देवी आदिशक्ती व शक्तिपीठ असल्याचे सिद्ध होते. कित्येक ग्रंथांमध्ये या देवीचे स्वरूप मांडले आहे. आता मात्र तिच्या नावात आणि स्वरूपात बदल करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, तो थांबविला पाहिजे.
- किरण आराध्य

जैन मंदिर
मी श्वेतांबर जैन असून, वारंवार देवीच्या दर्शनासाठी जातो. या मंदिराच्या परिसरात जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. तेव्हा मला असे वाटते की, बऱ्याच वर्षांपूर्वी तेथे जैन मंदिर असावे. राजसत्तेच्या स्थित्यंतरादरम्यान त्यात बदल झाला असावा. याबाबतचा इतिहास उपलब्ध झाल्यास त्या विषयावरही संशोधन व्हावे
- बाबूलाल ओसवाल

अंबाबाईचे ‘महालक्ष्मी’करण
माझे वय साठ आहे. माझ्या लहानपणापासून ‘आई अंबाबाईचे मंदिर’ असेच ऐकण्यात आहे. पूर्वापर जो गोंधळ घातला जातो, त्यातही
‘आई उदं गं अंबाबाई’ असाच उल्लेख आहे. मध्यंतरी ‘महालक्ष्मी मंदिर’ असा बोलबाला झाला. रस्त्यांवरील दिशादर्शक फलक, कागदोपत्री, वृत्तपत्रे, मासिके सगळीकडे ‘महालक्ष्मी’ असा उल्लेख होऊ लागला. पुरातन काळापासून देवीचा
‘अंबाबाई’ असा उल्लेख होत आला आहे. तो अबाधित राहावा; नाही तर या मंदिराचा इतिहास पुसला
जाईल.
- चंद्रसेन जाधव, राजारामपुरी

शक्तिपीठाची योग्य माहिती
फायदा या उद्देशाने एखाद्या धार्मिक स्थानाबाबत खोटा इतिहास समाजासमोर मांडणे चुकीचे आहे. मात्र, ‘लोकमत’ने या शक्तिपीठाचा सत्य इतिहास धार्मिक ग्रंथांचा पुरावा देऊन मांडला आहे. तिरूपती देवस्थानाकडून नवरात्रात येणारे महावस्त्र हा तेथील भाविकांच्या श्रद्धेचा भाग आहे. पण व्यंकटेश व अंबाबाईचे पती-पत्नीचे नाते असल्याचे सांगणे चुकीचे आहे.
- प्रा. राजन एस. चिकोडे (माजी सभापती, निपाणी नगरपालिका)े

महालक्ष्मीचा
इतिहास बदलतोय !

Web Title: Ambabai's true form in light - Congratulations to 'Lokmat':

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.