राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित
By Admin | Updated: July 13, 2016 23:18 IST2016-07-13T23:18:42+5:302016-07-13T23:18:42+5:30
राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम

राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित
- अझहर शेख
नाशिक : राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम कंपनीचे (बीएसएनएल) पोस्टपेड, प्रीपेड मोबाइल सीमकार्ड घेतले; मात्र महाराष्ट्र सीमा ओलांडल्यानंतर कुठल्याही प्रकारची रोमिंग सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने यात्रेकरूंची मोठी गैरसोय होत आहे.
अमरनाथ यात्रेसाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने यात्रेक रू गेले आहेत. शनिवारपासून (दि.१३) काश्मीर खोरे धगधगत असून, श्रीनगरपासून तर थेट बालटालपर्यंत निदर्शने आणि जाळपोळ फुटीरवाद्यांकडून केली जात आहे. त्यामुळे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या वणवा पेटला आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी कमांडर बुरहान वाणीला सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे पेटले आहे. फुटीरवाद्यांनी सैन्य, पोलीस, यात्रेकरूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे अमरनाथ यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत बीएसएनलचे सीमकार्ड ‘नो-नेटवर्क’ दाखवित असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातून गेलेल्या यात्रेकरूंचा संपर्क त्यांच्या नातेवाईक-मित्र परिवारापासून तुटला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय सैन्याने जम्मू येथून काश्मीर, श्रीनगरकडे यात्रेकरूंना जाण्यास सध्या मज्जाव केला आहे. अमरनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या सीमकार्डला कुठल्याही प्रकारची रेंज मिळत नसल्याने यात्रेकरू चिंताग्रस्त झाले आहेत. काश्मीर खोऱ्याच्या बातम्यांनी नातेवाईक चिंतेत असताना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधता येत नसल्याने यात्रेकरू हतबल झाले आहेत.
कटराच्या केंद्रात धाव
सीमकार्ड घेताना राष्ट्रीय रोमिंग नोंदवूनही बीएसएनएलकडून संगणकीय सर्व्हरमध्ये मात्र सीमकार्ड क्रमांकावर राष्ट्रीय रोमिंग सुविधा सुरू केली जात नसल्याने यात्रेकरूंची गैरसोय होत आहे. बहुतांश यात्रक रूंनी कटरा येथील भारत संचार निगमच्या कार्यालयात धाव घेऊन तक्रार केली; मात्र सीमकार्ड महाराष्ट्राचे असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनीही असमर्थता दर्शविली. यात्रेकरूंनी तेथील दूरध्वनीवरून मित्र व नातेवाइकांशी संपर्क साधत स्थानिक केंद्रात रोमिंग सुविधेबाबत तक्रार देण्यास सांगितले.
महाराष्ट्र ओलांडल्यानंतर नेटवर्क गेले. जम्मूमध्ये पोहचल्यावरही रेंज मिळत नव्हती. नातेवाइकांशी संपर्क साधता येत नव्हता. पोस्टपेड सीम खास यात्रेसाठी घेतला आहे. अखेर कटरा येथील केंद्रातून नातेवाइकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून शहरातल्या केंद्रात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर राष्ट्रीय रोमिंगची सुविधा सुरू झाली अन् मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाच दिवसांनंतर वृद्ध आई-वडिलांशी बोलले आणि दिलासा दिला.
- अमी पजवानी, यात्रेकरू, नाशिक