मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. राज्यातील सर्व शहर पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षकांची सहामाही बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.भत्त्याची ही रक्कम पोलीस कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाइतकी असेल. २०१४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील ड्युटीच्या भत्त्यापोटीची रक्कमही मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली. इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या ड्युटीसाठी भत्ता दिला जातो.पोलिसांना तो पहिल्यांदाच मिळणार आहे. राज्य पोलीस दलाने आरोपसिद्धीचा दर वाढविण्याची कामगिरी बजावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांचे अभिनंदन केले. गुन्ह्यांचा तपास आणि अपराध सिद्धतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्याने तयार करण्यात आलेल्या सायबर लॅबचा वापर अधिकाधिक करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
इलेक्शन ड्युटीसाठी पोलिसांना भत्ता
By admin | Updated: August 20, 2016 01:11 IST