चंद्रभागेतीरी राहुट्यांना परवानगी द्या ! सरकारची हायकोर्टाला विनंती
By Admin | Updated: July 21, 2015 01:11 IST2015-07-21T01:11:01+5:302015-07-21T01:11:01+5:30
चंद्रभागेतीरी राहुट्या उभारण्यास न्यायालयाने घातलेली बंदी येत्या रविवारपासून चार दिवसांसाठी उठवावी, असा विनंती अर्ज राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात केला.

चंद्रभागेतीरी राहुट्यांना परवानगी द्या ! सरकारची हायकोर्टाला विनंती
मुंबई : चंद्रभागेतीरी राहुट्या उभारण्यास न्यायालयाने घातलेली बंदी येत्या रविवारपासून चार दिवसांसाठी उठवावी, असा विनंती अर्ज राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात केला.
या अर्जावर मंगळवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. वारकऱ्यांना तंबू उभारून पूजा करता येईल, अशी व्यवस्था शासनाने येथून एक किमी अंतरावरील ६५ एकर भूखंडावर केली आहे. मात्र विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर वाळवंटात पूजा करण्याची प्रथा आहे. आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे तंबू न उभारता पूजा करताना पाऊस आल्यास आमची तारांबळ उडेल. पाऊस पडला नाही, तरी तंबुशिवाय भर उन्हात पूजा करणे अशक्य आहे. तेव्हा वाळवंटात तंबू उभारण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन वारकऱ्यांनी सोलापूर व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
त्याची दखल घेत ही बंदी तात्पुरती उठवण्यासाठी राज्य शासनाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती अॅड. वग्याणी यांनी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर केली. मात्र तंबू ठोकण्यास मनाईचे आदेश न्या. ओक यांनी दिल्यामुळे त्यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी होऊ शकते, असे न्या. पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानुसार अॅड. वग्याणी यांनी यावर सुनावणी घेण्याची विनंती अॅड. ओक यांना केली. पण या अर्जावर माझ्यासमोर सुनावणी होऊ शकत नसल्याचे न्या. ओक यांनी सांगितले. त्यामुळे अॅड. वग्याणी यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्यासमोर हा अर्ज सादर केला.(प्रतिनिधी)