महापालिका निवडणुकांसाठी युती; दानवे यांची घोषणा
By Admin | Updated: March 26, 2015 01:49 IST2015-03-26T01:49:24+5:302015-03-26T01:49:24+5:30
औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.
महापालिका निवडणुकांसाठी युती; दानवे यांची घोषणा
मुंबई : विधानसभा निवडणूक परस्परांविरुद्ध लढणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पार्टीने औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.
गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दोन्ही महापालिका निवडणुकीत युती करण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार आज दानवे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांना भाजपाचा पाठिंबा असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असून नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याकरिता निवडणुकीत युती होणे ही दोन्ही पक्षांची गरज आहे. मात्र जागावाटप हा युती आकाराला येण्यातील मुख्य अडसर असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते खासगीत मान्य करीत आहेत.
भाजपा-शिवसेनेतील वरचेवर होणाऱ्या वादाबाबत विचारले असता दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांचा मोठा संसार आहे. जेथे दोन लोक राहतात तेथे सुरुवातीला काही ना काही होत असते. मात्र युतीत सर्व काही आलबेल आहे. (विशेष प्रतिनिधी)