आघाडीने राज्याला लुटले

By Admin | Updated: October 8, 2014 23:04 IST2014-10-08T22:13:13+5:302014-10-08T23:04:37+5:30

मनोहर पर्रीकर : दोडामार्गमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान

The alliance looted the state | आघाडीने राज्याला लुटले

आघाडीने राज्याला लुटले

कसई दोडामार्ग : महाराष्ट्रात गेली पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी सत्तेत राहून जनतेला लुटले आहे. त्यांच्याकडील सर्व मंडळी भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे या आघाडी सरकारला हद्दपार करण्याची आणि नारायण राणेंना मुंबईत पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोडामार्ग येथे केले. शिवरायांच्या राज्यावर खरे प्रेम असते, तर शिवसेनेने युती तोडली नसती, असा टोला उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पर्रीकर यांनी लगावला.
भाजपाचे कोकण प्रचारप्रमुख व गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रचारसभा दोडामार्ग पिंपळेश्वर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर गोवा राज्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उमेदवार राजन तेली, भाजपाचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विजयकुमार मराठे, यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, चेतन चव्हाण, चंद्रशेखर देसाई, रमाकांत जाधव, सभापती महेश गवस, सीमा जंगले, आनंद रेडकर, सुनेत्रा नांगरे, स्मिता आठलेकर, चेतन चव्हाण, गणपत जाधव, प्रवीण गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोहर पर्रीकर म्हणाले, तुमची उपस्थिती ही विजयाची नांदी आहे. महाराष्ट्रात सर्व योजना राबवितात, मात्र, त्या योजना स्वत:च्या स्वार्थापोटी राबवितात. जनतेचा त्यांना काही विचार नाही. विकास आम्हीच केला, आम्हीच करू शकतो असे म्हणतात, मग गोवा राज्याप्रमाणे आजपर्यंत विक ास का झाला नाही? असा सवाल करून विरोधकांचा समाचार घेतला.
नरेंद्र मोदींवर टीका करतात. परंतु मोदी हेच खरे राष्ट्रभक्त आहेत. भाजपाला बहुमत मिळणार असल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणूनच या टीका केल्या जात आहेत. सिंधुदुर्गात एखादे टुरिस्ट हॉटेल घालायचे म्हटल्यास राणे सुपुत्र त्यामध्ये भागिदारी मागतात. त्यामुळे जनतेने राणेंनाच लोकसभेतून हद्दपार केले. तशाच पद्धतीने राणेंना आता मुंबईत पाठवा, असे आवाहन पर्रीकर यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेची जाहिरात करतात. विकास कामेच केली नसतील, तर सारे काही स्वच्छच राहणार, असा टोलाही लगावला. यावेळी गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अतुल काळसेकर, राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)

शिवसेनेवर टीका
मित्रपक्ष भाजपावर टीका करतात. अफजल खानाच्या तोफा निवडणुकीत उतरल्या, भाजपकडे नेता नाही, अशी टीका केली जाते. परंतु अफजल खान ज्यांच्या मनात आहे, तोच टीका करत असून जनतेला सर्वज्ञात आहे. तसेच शिवाजी राजे हे सर्वांचेच दैवत असून त्यांचा वारसाहक्क केवळ शिवसैनिकांना दिलेला नाही.

Web Title: The alliance looted the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.