युती सरकार जास्त काळ टिकणार नाही : जयंत पाटील
By Admin | Updated: January 13, 2015 00:07 IST2015-01-12T23:22:53+5:302015-01-13T00:07:00+5:30
भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल.

युती सरकार जास्त काळ टिकणार नाही : जयंत पाटील
मिरज : भाजप-शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस असल्याने युती सरकार जास्त काळ टिकणारे नाही. दोन-तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे आज, सोमवारी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माताई होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जयंत पाटील म्हणाले की, नकारात्मक मतदानामुळे राज्यात ब्राह्मण्यवाद्यांचे सरकार सत्तेवर आले. फडणवीस, जावडेकर, केळकर या मंडळींनी शेती कधीही केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू असल्याने युती शासन जास्त काळ टिकणारे नाही. दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल. मिरज तालुक्यात कुंपणावरचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी पक्षातून बाहेर पडले. राहिलेले सर्व पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष आता संपल्याने भाजपशी मुकाबला करायचा आहे. तालुक्यातील सोसायट्या, ग्रामपंचायती यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, दोन वर्षात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी गाव कमिट्या, प्रभाग समित्या, युवक, महिला आाघाड्या तयार करा, शेतकरी शेतमजुरांची कामे करून त्यांचा विश्वास मिळावा. मिरज पूर्व भागातील रस्ते व पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, पंचायत समिती सदस्या सारिका खताळ, बाळासाहेब होनमोरे, अनिता कदम, गंगाधर तोडकर, परशुराम नागरगोजे, आरगचे सरपंच एस. आर. पाटील, परशुराम जाधव, बाळासाहेब माळी, अर्जुन माळी उपस्थित होते. (वार्ताहर)