अकोला महापालिकेवर युतीचा झेंडा
By Admin | Updated: September 10, 2014 19:59 IST2014-09-10T19:58:22+5:302014-09-10T19:59:10+5:30
भाजपच्या उज्वला देशमुख महापौर; उपमहापौरपदी शिवसेनेचे विनोद मापारी.

अकोला महापालिकेवर युतीचा झेंडा
अकोला- अकोला महापालिकेच्या सहाव्या महापौर म्हणून बुधवारी भाजपच्या उज्वला देशमुख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे युवा नगरसेवक विनोद मापारी यांची निवड झाली. सुरुवातीची अडीच वर्षे सत्तेत असलेल्या भारिप-बमसंने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, तर काँग्रेस सदस्यांनी अर्ज छाननीनंतर सभागृहातून बहिर्गमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याने युतीला साडेसात वर्षानंतर महापालिकेची सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली.
फेब्रुवारी २0१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, काँग्रेसने भारिप-बमसंला महापौरपदासाठी पाठिंबा देऊन सत्ता मिळविली होती. भारिप-बमसंच्या ज्योत्स्ना गवई यांची महापौरपदी निवड झाली. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपल्याने, बुधवारी पुढील अडीच वर्षांसाठी निवडणूक घेण्यात आली. मनपा सभागृहात सकाळी १0 वाजता पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांनी विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.
सर्वधारण महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी भाजपच्या उज्वला देशमुख, अपक्ष नगरसेविका हाजरा बी अब्दुल रशिद यांच्यासह काँग्रेसच्या पाच उमेदवारांचे अर्ज होते. सभेसाठी भारिप-बमसंचे बबलू जगताप आणि वैशाली मानवटकर हे दोघे वगळता सर्व सदस्य अनुपस्थित होते.
१३ सदस्य अनुपस्थित असल्याने सभागृहात एकूण ६0 सदस्यांची उपस्थिती होती. अर्ज छाननीनंतर काँग्रेसच्या १३ सदस्यांनी सभागृहातून बर्हिगमन केले. त्यानंतर पार पडलेल्या म तदान प्रक्रियेत ४७ सदस्यांनी सहभाग घेतला. भाजपच्या उज्वला देशमुख यांनी ३७ मतं घेऊन विजय मिळविला. त्यांना भाजपचे १८, शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तसेच भारिप- बमसंच्या एका सदस्यासह ७ सर्मथित अपक्षांची मतं मिळाली. अपक्ष उमेदवार हाजरा बी यांना ८ मतं मिळाली. एका नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली.
उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे विनोद मापारी आणि समाजवादी पार्टीचे नकीर खान यांनी अर्ज भरला होता. मापारी यांना मनसेचे राजेश काळे यांचे अतिरिक्त मत मिळून, एकूण ३८ मतं मिळाली. नकीर खान यांना ८ मतं मिळाली. काळे एका हत्या प्रकरणात कारागृहात असल्याने न्यायालयाच्या परवानगीने ते निवडणुकीसाठी सभागृहात आले होते. ते महापौर पदासाठी झालेल्या मतदानाच्यावेळी उपस्थित राहू शकले नाही; मात्र उ पमहापौर पदासाठी त्यांनी शिवसेनेला मतदान केले. भारिप- बमसंने काँग्रेसला पाठिंबा नाकारून, सभागृहात उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य फुटल्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा मनपात सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.