खोतकरांवरील आरोपांची एसीबीकडून चौकशी
By Admin | Updated: August 20, 2016 06:05 IST2016-08-20T06:05:07+5:302016-08-20T06:05:07+5:30
आम आदमी पार्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर केलेल्या आरोपांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

खोतकरांवरील आरोपांची एसीबीकडून चौकशी
- यदु जोशी, मुंबई
आम आदमी पार्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर केलेल्या आरोपांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
खोतकर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या आरोपांची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी तसे पत्रदेखील मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी एसीबी चौकशीचा निर्णय घेतला. एखाद्या मंत्र्यांवरील आरोपांची एसीबीमार्फत चौकशी होण्याची फडणवीस सरकारमधील ही पहिलीच वेळ आहे. स्वत: खोतकर यांनीच नि:ष्पक्ष चौकशीची मागणी केल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. याआधी शिवसेनेच्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांचे जोरदार खंडन मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केले होते.
‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी १६ आॅस्गस्टला पत्र परिषद घेऊन खोतकर यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती या नात्याने ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात, ‘जालना बाजार समितीवरील आरोपांची नि:ष्पक्ष चौकशी करा आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या, अशी विनंती केली. १९९० पासून सार्वजनिक जिवनात आपण प्रामाणिकपणे काम करीत आहोत. आपल्यावरील ‘आप’चे आरोप बिनबुडाचे असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. खोतकर यांनी या पत्रासोबत आरोपांबाबत काही कागदपत्रेही मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द केली.
खोतकर यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यावरील आरोपांबाबत बाजू मांडली.
चौकशी सुरू...
एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींमार्फत केली जात आहे.
पंकजा मुंडे, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर आदी मंत्र्यांवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आरोप झाले. ‘विरोधकांच्या आरोपांमध्ये दम नाही’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जोरदार बचाव केला होता.
मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंत्र्यांची चौकशी होत आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्यांचे मोठे आरोप झाले होते. मात्र त्यांच्यावरील आरोपही मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले होते.