तरुणीवरील अत्याचारविरोधात कोपरगावात निघाला सर्वपक्षीय मोर्चा
By Admin | Updated: July 5, 2017 13:07 IST2017-07-05T12:39:02+5:302017-07-05T13:07:44+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मुकबधीर व मतिमंद तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तहसील कचेरीवर बुधवारी सकाळी सर्व पक्षीय निषेध मोर्चा निघाला आहे.

तरुणीवरील अत्याचारविरोधात कोपरगावात निघाला सर्वपक्षीय मोर्चा
ऑनलाइन लोकमत
कोपरगाव, दि. 5 - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मुकबधीर व मतिमंद तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तहसील कचेरीवर बुधवारी सकाळी सर्व पक्षीय निषेध मोर्चा निघाला आहे. मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. कोपरगाव शहरात राहणा-या एका वीस वर्षीय मतीमंद तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे यास अटक केली आहे.
त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमाव जमला होता. त्यामुळे गांधीनगर भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबाबत माहीती अशी की, रवींद्र मोरे याने हा सोमवार ( ३ जुलै २०१७) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतीमंद मुलीस बळजबरीने घेवून गेला.
रात्रभर अत्याचार करून मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिला घराच्या परिसरात आणून सोडले. पीडित मुलीने रात्रभर झालेला सर्व प्रकार आपल्या आईला हातवारे करून सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या मोर्चामध्ये आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, राष्ट्रवादीच्या पुष्पाताई काळे, काका कोयटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, शहर प्रमुख असलम शेख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, मनसेचे सतीश काकडे आदींसह असंख्य कार्यकर्ते तसेच प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस उपअधीक्षक सागर पाटील, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे. साहेबराव कडनोर आदी सहभागी झाले आहेत.