युती-आघाडी तुटल्याने जिल्ह्यात सर्वपक्षीय चुरस
By Admin | Updated: October 13, 2014 04:49 IST2014-10-13T04:49:15+5:302014-10-13T04:49:15+5:30
राज्याच्या सत्तासोपानाच्या लढाईत विधानसभेच्या १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत १७ मतदारसंघांत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीने काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड दिले होते़

युती-आघाडी तुटल्याने जिल्ह्यात सर्वपक्षीय चुरस
राज्याच्या सत्तासोपानाच्या लढाईत विधानसभेच्या १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत १७ मतदारसंघांत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीने काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड दिले होते़ यामुळे जिल्ह्यातील पुन्हा अशाच विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीचा घटस्फोट झाल्याने आमदार होण्याची स्वप्ने रंगवणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे़
ठाणे हा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात १८ पैकी ९ जागा युतीने जिंकल्या होत्या. ६ ठिकाणी राष्ट्रवादी, २ ठिकाणी मनसे आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय नोंदविला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तीनपैकी दोन मतदारसंघांत शिवसेना आणि एका ठिकाणी भाजपाची सरशी झाली.
ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, शहापूर, भिवंडी पूर्व या सहा ठिकाणी शिवसेनेचे तर डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी ग्रामीण या मतदारसंघांत भाजपाचे आमदार प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी मतविभाजनाचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. त्यात भाजपाची जिल्ह्यातली अवस्था तोळामासा आहे़, तर शिवसेनेला ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरी पट्ट्यात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी झगडावे लागत आहे. मराठी माणूस एकत्र आल्याने भाजपाला नाकीनऊ आले आहे़
ठाणे शहरात कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा या दोन मतदारसंघांत काँगे्रस-भाजपाने तगडे उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांची लढाई सोपी झाली आहे़ मात्र, ठाणे शहर मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र फाटक, भाजपाचे संजय केळकर, राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, काँगे्रसचे नारायण पवार अशी चौरंगी लढत आहे़ कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना या खेपेला कसरत करावी लागत आहे़
नवी मुंबईत शिवसेना-भाजपा युतीतली दुही आता नाईक पिता-पुत्राच्या पथ्यावर पडणारी आहे. मीरा-भार्इंदर मतदारसंघात काँगे्रसचे याकुब कुरेशी, राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा, शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे अन् भाजपाचे नरेंद्र मेहता अशी चौरंगी लढत अपेक्षित आहे़
कल्याण पूर्व मतदारसंघात विजय मिश्रा- काँग्रेस, निलेश शिंदे- राष्ट्रवादी, गोपाळ लांडगे- शिवसेना, विशाल पावशे- भाजपा आणि नितीन निकम- मनसे आणि अपक्ष गणपत गायकवाड अशी षटकोनी लढत असली खरी चुरस शिवसेनेच्या गोपाळ लांडगे आणि अपक्ष गणपत गायकवाड यांच्यात आहे़़ कल्याण पश्चिम मतदारसंघात काँगे्रसचे सचिन पोटे, राष्ट्रवादीचे संजय पाटील, शिवसेनेचे विजय साळवी, भापजाचे नरेंद्र पवार आणि मनसेचे विद्यमान आमदार प्रकाश भोईर यांच्यात पंचरंगी चुरस पाहायला मिळणार आहे़
कल्याण ग्रामीणमध्ये काँगे्रसच्या शारदा पाटील, राष्ट्रवादीचे वंडार पाटील, शिवसेनेचे सुभाष भोईर, मनसेचे रमेश पाटील यांच्यात चुरस आहे़
भिवंडी पूर्व मतदारसंघात मोहम्मद फजिल अन्सारी- काँग्रेस, शेख खलिद गुड्डू- राष्ट्रवादी, रूपेश म्हात्रे- शिवसेना, संतोष शेट्टी- भाजपा आणि अबू आझमी- समाजवादी पार्टी अशी पंचरंगी लढत आहे़ भिवंडी पश्चिममध्ये खान शोएब अशफाक- काँग्रेस, अब्दुल ताहीर- राष्ट्रवादी, मनोज काटेकर- शिवसेना, महेश चौगुले- भाजपा आणि अब्दुला अन्सारी- समाजवादी यांच्यात चुरस आहे़
भिवंडी ग्रामीणमध्ये सचिन शिंगडा- काँग्रेस, महादेव घाटाळ- राष्ट्रवादी, शांताराम मोरे- शिवसेना, शांताराम पाटील- भाजपा आणि दशरथ पाटील- मनसे यांच्यात चुरस आहे़
शहापूर मतदारसंघात पद्माकर केवारी- काँग्रेस, पांडुरंग बरोरा- राष्ट्रवादी, दौलत दरोडा-शिवसेना, अशोक ईरनक- भाजपा आणि ज्ञानेश्वर तलपडे- मनसे अशी पंचरंगी लढत आहे.
मुरबाड मतदारसंघात काँग्रेसचे राजेश घोलप, गोटीराम पवार-राष्ट्रवादी, वामन म्हात्रे- शिवसेना, किसन कथोरे-भाजपा यांच्यात चुरस आहे़
अंबरनाथ मतदारसंघात कमलाकर सूर्यवंशी- काँगे्रस, महेश तपासे- राष्ट्रवादी, बालाजी किणीकर- शिवसेना, राजेश वानखेडे- भाजपा, विकास कांबळे- मनसे अशी पंचरंगी लढत आहे़