सर्व पक्षांत ‘भाई-दादा’
By Admin | Updated: February 14, 2017 04:20 IST2017-02-14T04:20:40+5:302017-02-14T04:20:40+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याबद्दल प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवत असला तरी, मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांनी

सर्व पक्षांत ‘भाई-दादा’
यदु जोशी / मुंबई
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याबद्दल प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवत असला तरी, मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकली, तर सर्वच राजकीय पक्षांनी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले ‘भाई’ आणि ‘दादा’ मंडळींना रिंगणात उतरविले असल्याचे दिसून येते.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांची संभावना ‘गुंडांचे कप्तान’ अशी केली असली तरी, गंभीर गुन्हे दाखल असूनही उमेदवारी मिळालेल्या ‘भार्इं’ची संख्या शिवसेनेत सर्वाधिक आहे. राज ठाकरे यांच्या ‘मनसे’च्या उमेदवारांमध्ये देखील अशा भाई-दादांचा भरणा आहे.
उपराजधानीत ६३ कलंकित उमेदवार
जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये कलंकित उमेदवार असून, भाजपा व काँग्रेसमध्ये अशांची संख्या सर्वाधिक
आहे. काही काळाअगोदर नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही चेहरे यंदा स्वत:च उमेदवार म्हणून उतरले आहेत.
निवडणुकांच्या दंगलीत उतरलेल्या अनेकांवर राजकीय आंदोलनांचे गुन्हे दाखल आहेत, तर काहींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
६३ जणांवर विविध न्यायालयांत खटले सुरू असून, दोषसिद्धी झाल्यास त्यांना एक-दोन किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.
भाजपाचे विद्यमान नगरसेवक व शिवसेनेच्या तिकिटावरून संघ मुख्यालयाच्या प्रभागात निवडणूक लढणारे अनिल धावडे यांच्यावर, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीकरिता शिक्षा होऊ शकेल अशी ११ प्रकरणे प्रलंबित आहेत. तर ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले आहे, अशा प्रकरणांची संख्या १० इतकी आहे.
मुंबई : उमेदवारांच्या विरोधात दाखल गुन्हे
उमेदवारांचे गुन्हे नोंद गंभीर गुन्हे गंभीर
पक्ष उमेदवार असलेले गुन्ह्यांची
उमेदवार संख्या
शिवसेना ६३ ४३८१
काँग्रेस ३५ २८ ४४
भाजपा २४ ११ २९
राष्ट्रवादी १९ १२ २९
मनसे ५३ ३६ ६४
इतर काही पक्षांमधील गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या - सपा : ५, बसपा : ५, रिपाइं : १५, एमआयएम : ८, अपक्ष : ८७, अ.भा. सेना : ५, बहुजन विकास पार्टी : ३.
1990 च्या दशकात पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर आदींना लाभलेल्या राजकीय आशीर्वादावरून भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी रान उठविले. मुंबई महापालिकेच्या आखाड्यात गुन्हे दाखल असलेल्यांची सर्वपक्षीय संख्या ३४९ इतकी आहे.
भाजपाच्या मंचावर एकेकाळी संत-महंत अन् शंकराचार्य बसायचे. त्यांच्या मंचावर आता गुंडाचार्य बसू लागले आहेत. उद्या ते दाऊदलादेखील आणतील!
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख
गुंडांना भाजपात घेऊन पवित्र करण्याचे काम ‘देवेंद्रभाई’ करीत आहेत. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
गुंडांना आश्रय देण्याचा आरोप जे आमच्यावर करतात त्यांच्या पक्षाची याबाबत काय स्थिती आहे, त्यांच्या पक्षाचा इतिहास काय ते मी लवकरच सांगणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री