Sudhakar Badgujar BJP: भाजप नेत्यांशी जवळीक वाढताच ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले असताना घडलेल्या या राजकीय घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राणेंनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता भाजप त्यांना सामावून घेणार असल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांचा पारा चढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये संजय राऊतांनी नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे. व्हायरल होत असलेला नितेश राणेंचा व्हिडीओ रिपोस्ट करत राऊतांनी निशाणा साधला आहे.
वाचा >>बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
राऊत म्हणाले, "ह्याचा आज खऱ्या अर्थाने 'पोपट' झाला रे… बॉम्ब ब्लास्टमधील सलीम कुत्ताचे बॉस भाजपामध्येच बसलेत", अशी टीका संजय राऊतांनी नितेश राणे आणि भाजपवर केली.
संजय राऊतांनी आणखी एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नितेश राणे बोलत आहेत, तर त्यांच्या बाजूला आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे दिसत आहेत.
भाजप निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष -राऊत
संजय राऊतांनी नितेश राणे आणि भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, "या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे! गृहमंत्री फडणवीस, तुमचे लोक त्या सलीम कुत्ताला उगाच बदनाम करीत होते; भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे. देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळे ढोंग आहे", अशा शब्दात राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागले.
ठाकरेंच्या शिवसेनेत असताना सुधाकर बडगुजर यांच्यावर २०२३ मध्ये गंभीर आरोप करण्यात आले होते. सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तासोबत फोटो समोर आला होता. काही व्हिडीओही व्हायरल झाले होते, ज्यात बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचताना दिसत होते.
याच प्रकरणावरून भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला घरले होते. संजय राऊत हे बडगुजर यांचे गॉडफादर आहेत, त्यांचीही चौकशी करायला पाहिजे. संजय राऊतांवरही देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे, असे नितेश राणे त्यावेळी म्हणाले होते.