बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार

By यदू जोशी | Updated: June 17, 2025 11:38 IST2025-06-17T11:35:33+5:302025-06-17T11:38:25+5:30

नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून पक्षात प्रचंड घमासन सुरू आहे.

maharashtra politics BJP in turmoil over Sudhakar Badgujar's entry, Bawankule in darkness, Girish Mahajan's initiative | बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार

बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार

यदु जोशी

मुंबई - नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून पक्षात प्रचंड घमासन सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांना कोणतीही कल्पना न देता प्रदेश भाजपच्या कार्यालयात दुपारी बडगुजर यांना प्रवेश दिला जाणार आहे. स्वतः बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला या प्रवेशाची कुठेही कल्पना नसल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक नेत्यांच्या एकमताशिवाय प्रवेश होत नाहीत. प्रवेशावेळी नेते, आमदार, खासदारांचं एकमत पाहतो. विधानसभा निवडणुकीला सहाच महिने झाले आहेत. नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकमेकांविरुद्ध लढतो तेव्हा एक प्रकारची विरोधाची भावना निर्माण होते.

बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करणाऱ्या नाशिक मधील पक्षाचे आमदार सीमा हिरे म्हणाल्या की,  सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला माझा विरोध कायम आहे. काल मी सोशल मिडीयावर पोस्ट देखील केले होते. अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणे अवघड आहे .आज ते प्रवेश करणार आहेत याबाबत मला काही कल्पना नाही. जे देशद्रोही आहेत , बंडखोर आहेत किंवा ज्यांनी गोळीबार केले आहेत , ते आमच्याच मतदारसंघात आहेत . अशा लोकांबरोबर एकत्र काम कसे करणार ?

बडगुजर यांच्या प्रवेशासाठी नाशिकचे स्थगित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. त्यामागे नाशिक महापालिकेत  भाजपला सत्तेत आणण्याचे गणित असल्याचे मानले जाते. प्रदेश भाजपच्या कार्यालयाला कुठलीही कल्पना न देता बडगुजर यांना प्रवेशासाठी मुंबईत बोलावून घेण्यात आले असे सूत्रांनी सांगितले. यावरून बावनकुळे यांनी मंगळवारी सकाळी गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा  केली आणि तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी आपल्याला फोन केला आणि मुंबईत बोलावून घेतले आहे असे बडगुजर यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे हा प्रवेश महाजन यांच्या माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: maharashtra politics BJP in turmoil over Sudhakar Badgujar's entry, Bawankule in darkness, Girish Mahajan's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.