शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

...सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

By admin | Updated: February 6, 2017 01:00 IST

मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसते, त्यांना खरेतर मराठीशी काही घेणेदेणे नाही. प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीनुसार मराठीचे भांडवल करीत असतो.

शफी पठाण, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसते, त्यांना खरेतर मराठीशी काही घेणेदेणे नाही. प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीनुसार मराठीचे भांडवल करीत असतो. यात सर्वसामान्य मराठी जनांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यामुळे हे सगळेच मराठीचे मारेकरी आहेत, असा संतप्त सूर रविवारी संमेलनातील डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात झालेल्या ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ या परिसंवादात व्यक्त झाला.आनंद मिणसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, डॉ. अमृता इंदुरकर, प्रा. कृष्णा कुळकर्णी, डॉ. दीपक पवार, डॉ. कमलाकर कांबळे, अ‍ॅड. शांताराम दातार या वक्त्यांनी जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी कुठे असेल, यावर गंभीर व अतिशय अभ्यासपूर्ण मते मांडली. परिसंवादाची सुरुवात करताना डॉ. पवार म्हणाले, आज मराठीची जी अवस्था आहे, त्यावरून असे वाटते की, २० वर्षांनंतर कुणीही संमेलनात मराठी कविता ऐकायला येणार नाही. याला कारणीभूत खऱ्या अर्थाने राजकारणी आहेत. त्यांनी साखर कारखान्यांप्रमाणे इंग्रजी शाळा लाटल्या आणि आता त्यातून ते बक्कळ पैसे कमवत आहेत. नवीन पिढी मराठी शिकणार कशी? राज्यातील सर्वच वाचनालये अंतिम घटका मोजत आहेत. दस्तुरखुद्द शरद पवार ज्या मुंबई मराठी ग्रंथालयाचे नेतृत्व करताहेत, त्या वाचनालयाची स्थितीही अतिशय गंभीर आहे. मंत्रालयातील मराठी भाषा भवनाचा प्रश्न ५७ वर्षांपासून होता तसाच कायम आहे. राजकीय नेत्यांची इच्छाशक्तीच नाही. तेच खरे मराठीचे मारेकरी आहेत, असा थेट आरोप डॉ. पवार यांनी केला. डॉ. कांबळे म्हणाले, आजच्या मराठीच्या विद्यार्थ्याला समग्र तुकाराम वाचला का, असे विचारले, तर तो म्हणतो, समग्र वाचून काय उपयोग. परीक्षेत तुकारामांवरचा प्रश्नच मुळात पाच गुणांचा असतो. ही आजच्या शिक्षणव्यवस्थेची अवस्था आहे आणि ती ज्यांच्यामुळे निर्माण झाली आहे, तेच मराठीचे खरे मारेकरी आहेत. डॉ. इंदुरकर यांनी भाषेच्या भेसळीवर कडाडून टीका केली. आजच्या तरुणाईची भाषा बदलली आहे. ‘मला अर्जंटमध्ये यावे लागले’, ‘मी तुझा किती वेळ वेट करीत होते’, अशी ना धड मराठी आणि ना धड इंग्रजी बोलले जात आहे. मराठीच्या हितासाठी काय करायला हवे, हे या तरुणाईला कळत नाही, असे नाही. परंतु, मुळात इंग्रजी भाषा ही स्टेटस सिम्बॉल झाल्याने मराठी आज अडगळीत पडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. कुळकर्णी यांनीही या विषयावरून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मराठीच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारी ज्या सरकारच्या खांद्यावर आहे, त्या सरकारी यंत्रणेत तरी किती मराठीचा वापर होतो, हा खरा प्रश्न आहे. हेच सरकार जी शिक्षणव्यवस्था चालवते, ती व्यवस्था विद्यार्थ्यांना संस्कृत विषय घ्यायला सांगते. का तर, या विषयातून गुणांची टक्केवारी वाढवता येते. असे जर शिक्षकच सांगत असतील, तर त्या विद्यार्थ्याने भाषेबद्दल काय आदर्श घ्यावा? उगाच भाषेचे वर्गीकरण करू नका. ती ब्राह्मणांची ही अब्राह्मणांची, असा भेद करू नका. बोलीभाषेतील शब्द प्रमाण मराठीत येऊ द्या. असे झाले तर ग्रामीण भाषेचा पोत आणखी समृद्ध होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संमेलनाध्यक्ष वर्षभरात काय करतात?आज अनेक महापालिकांचे फलक इंग्रजीत आहेत. सरकार एक आदेश पारित करून ते मराठीतच लावावे, असा नियम करीत नाही. मुळातच राजकीय पक्षांना मराठीचा कळवळा नाही. निवडणूक आली की, ते हा विषय पद्धतशीरपणे कॅश करतात. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तेच केले आहे. दुसरे म्हणजे, संमेलनाचे अध्यक्ष संमेलनाच्या मांडवात मराठीवर जोरदार भाषण देतात, परंतु संमेलन संपल्यावर ते मराठीसाठी काय करणार, हे का सांगत नाही, असा सवाल अ‍ॅड. शांताराम दातार यांनी केला. वर्तमान अध्यक्षांनीही आपल्या भाषणात याबाबत काहीच सांगितले नाही, यावरही त्यांनी खंत व्यक्त केली. बेळगावकर मराठीचे खरे संरक्षक महाराष्ट्रात मराठीच्या अस्तित्वाला घेऊन असे परिसंवाद आयोजित करण्याची वेळ आलेली असताना सीमाभागातील बेळगावसह सर्व गावे मराठीच्या संवर्धनासाठी अविरत संघर्ष करत आहेत. या भागातील २५ लाख माणसे राज्यघटनेने त्यांना दिलेले भाषिक अधिकार मिळावेत, यासाठी लढा उभारत आहेत, अशी माहिती या परिसंवादाचे अध्यक्ष आनंद मिणसे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, साहित्याबाबत विचाराल तर या भागात दरवर्षी सुमारे २५ विविध साहित्य संमेलने होतात. त्यातील प्रत्येक संमेलनात २५ हजार लोकांची गर्दी असते आणि भाषेच्या संवर्धनसाठी अशी संमेलने आयोजित करताना त्यांना कुठलेही सरकारी अनुदान मिळत नाही. या समर्पित वृत्तीने प्रत्येक मराठी व्यक्ती भाषेच्या स्वरक्षणार्थ पुढे आली, तर या भाषेच्या मारेकऱ्यांना आपले शस्त्र म्यान करावे लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्हाला आसाराम का पूजनीय वाटतो? : आपल्या अभंग-कीर्तनांतून मराठीला समृद्ध करणारे शेकडो संत महाराष्ट्रात होऊनही आम्हाला आसारामसारखा आरोपी महाराज का महत्त्वाचा वाटतो, यावर चिंतन झाले, तर मराठीचे आजचे मारेकरी कोण, हे स्पष्ट होईल, अशा प्रखर शब्दांत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आपले विचार मांडले. इतक्या गंभीर विषयावरचा परिसंवाद संमेलनाच्या मुख्य मंडपात होत नाही, यावरून मराठीप्रति कोण, किती गंभीर आहे, ते स्पष्ट होते. गणपती दूध पितो, हे आम्ही इंटरनेटवरून दाखवतो, हा विज्ञानाचा दुरुपयोग आहे. वारकऱ्यांची मुलाखत घेणारा टीव्हीचा अँकर मुक्ताबाई आकाशातून आली, असे जर सांगत असेल, तर लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळणार तरी कसे? पण, अशा विपरित परिस्थितीतही घाबरण्याचे कारण नाही. कारण, जोपर्यंत मराठी बोलणारा शेवटचा माणूस जिवंत असेल, तोपर्यंत मराठीला मरण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.