राणेंविरोधात सर्व एकवटणार
By Admin | Updated: September 25, 2014 23:28 IST2014-09-25T22:55:07+5:302014-09-25T23:28:43+5:30
विधानसभेतही पुनरावृत्ती : सिंधुदुर्गात विरोधकांची पुन्हा तीच रणनीती

राणेंविरोधात सर्व एकवटणार
महेश सरनाईक - कणकवली -विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता (२७ सप्टेंबर) येवून ठेपली आहे. मात्र, युती आघाडीमधील कोंडी फुटताना दिसत नाही. असे असले तरी गत काही निवडणुकांप्रमाणेच यावेळीदेखील सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पराभव करण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक पुन्हा एकवटण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. युती झाली अथवा नाही तरी राणेंना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेसमधील एक गट, राष्ट्रवादीमधील एक गट एकत्र येवून राणेंच्या पराभवासाठी आराखडा बनवत आहेत. राणे या निवडणुकीत या सर्र्वावर कशी मारतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नारायण राणे यांनी राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. गत लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून झालेला पराभव हा या राजकारणातीलच एक भाग आहे. नीलेश राणेंचा पराभव वगळता आतापर्यंत राणे हे जिल्ह्यातील आपल्या विरोधकांना कायमच पुरून उरले आहेत. मात्र, याला अपवाद म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. लोकसभा निवडणूक ही देशात अभूतपूर्व निवडणूक झाली. त्यात महाराष्ट्र राज्यासह देशाच्या अनेक भागातील दिग्गजांना पराभवाची चव चाखायला लागली. मात्र, असे असले तरी निलेश राणेंचा झालेला पराभव नारायण राणेंच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यातच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही दोन वेळा दिला होता. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक अवस्थेत त्यांनी झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा काँग्रेसमध्येच सक्रिय काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींना त्यांच्याकडे राज्यातील प्रचार प्रमुखपद सोपवले. त्यामुळे नारायण राणे हे आता केवळ सिंधुदुर्ग आणि कोकणातच नव्हे तर राज्यभर प्रचारदौरे करणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी सिंधुदुर्गात जास्त वेळ देणे तसे अवघडच होणार आहे. त्यामुळे राणे यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे राजकीय विरोधक कंबर कसताना आढळत आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख आणि मालवण-कुडाळ मतदारसंघातील राणेंचे प्रतिस्पर्धी वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधाची भूमिका जाहीर केली. त्यात त्यांनी हेच स्पष्ट केले आहे, की राज्यात महायुतीबाबत कोणताही निर्णय होऊ दे, सिंधुदुर्गात राणेंविरोधात सर्व एकवटून प्रचार करणार आहोत. आतापर्यंत कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे यावर शिक्कामोर्तब झाले असून सावंतवाडीही हाच फॉर्म्युला असेल.
सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघाचा विचार करता कणकवलीमध्ये भाजपाकडून प्रमोद जठार यांच्याविरोधात काँग्रेसकडून अजूनही नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी नितेश राणे हे निवडणूक लढविणार आहेत. आमदार विजय सावंत आणि कुलदीप पेडणेकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे विरूद्ध जठार अशीच ही लढत होणार आहे. यात अपक्ष किती मते मिळवितात, यावर भवितव्य अवलंबून असेल. नारायण राणे यांच्याविरोधात वैभव नाईक यांच्यात सरळ लढत होत आहे. मात्र, येथेही राणे विरूद्ध सर्व विरोधक असेच चित्र आहे. कारण वैभव नाईक यांनी मालवणमध्ये बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला भाजपाचे मालवणातील पदाधिकारीही उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चव चाखलेले काँग्रेस कार्यकर्ते विधानसभेमध्ये काय करतात?ते पाहण्यासाठी आता १९ आॅक्टोबरची वाट पहावी लागणार आहे.
सर्वात चुरशीची लढत होणार आहे ती सावंतवाडी मतदारसंघात. कारण येथे शिवसेनेकडून दीपक केसरकर, आघाडी झाल्यास राष्ट्रवादीकडून सुरेश दळवी, मनसेकडून परशुराम उपरकर, अपक्ष म्हणून राजन तेली असे एकापेक्षा एक मातब्बर उमेदवार रिंगणात असतील. गत निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी करणारे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते राणेंचा आदेश मानून काय करतात? यावरही बहुतांशी गणिते अवलंबून असणार आहेत.