परिषदेच्या चारही जागा युतीकडे ?
By Admin | Updated: January 13, 2015 05:28 IST2015-01-13T05:28:34+5:302015-01-13T05:28:34+5:30
विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान होणार आहे.
परिषदेच्या चारही जागा युतीकडे ?
मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान होणार आहे. निवडून येण्यासाठी तब्बल १४४ मतांचा कोटा लागणार असल्याने या चारही जागा भाजपा-शिवसेनेच्या पदरात पडू शकतात.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपाचे अॅड. आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्याने आणि राष्ट्रवादीचे विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूक असल्याने प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरविले आहे.
त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी मतांचा कोटा निश्चित होईल. एकूण सदस्य संख्या भागिले दोन अधिक एक याप्रमाणे कोटा ठरेल. विधानसभेचे एकूण संख्याबळ २८८ आहे. मात्र भाजपाचे गोविंद राठोड आणि शिवसेनेचे बाळा सावंत यांचे निधन झाल्याने सध्या २८६ आमदार आहेत. त्याच्या निम्मे म्हणजे १४३ आणि अधिक एक म्हणजे १४४ मतांचा कोटा प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी लागेल.
काँग्रेसचे ४३ तर राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लढले तरी त्यांचे संख्याबळ ८५ होते. १४४ चा टप्पा कोणत्याही परिस्थितीत त्यांना गाठता येणार नसल्याने आघाडीच्या पारड्यात एकही जागा जाणार नाही. या चारपैकी दोन जागांची मुदत ही ७ जुलै २०१६ रोजी संपणार आहे. तिसऱ्या जागेचा कालावधी २७ जुलै २०१८ पर्यंत असून चौथ्या जागेचा कालावधी २४ एप्रिल २०२० पर्यंत आहे.
शिवसेनेकडून एप्रिल २०२० मध्ये कार्यकाळ पूर्ण होणारी जागा मिळावी, असा आग्रह धरला जाऊ शकतो. भाजपाकडून इच्छुक असलेल्यांचा आग्रहदेखील जास्तीत जास्त कालावधीची जागा आपल्याला मिळावी असाच असेल. या परिस्थितीत उमेदवार आणि त्यांचा कार्यकाळ ठरविताना भाजपा नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
(विशेष प्रतिनिधी)