ऑल द बेस्ट ! उद्या लागणार बारावीचा निकाल
By Admin | Updated: May 29, 2017 16:11 IST2017-05-29T16:06:26+5:302017-05-29T16:11:31+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

ऑल द बेस्ट ! उद्या लागणार बारावीचा निकाल
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरली जात होती. अखेर राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. दरम्यान, बारावीत किती टक्के गुण मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षा सुमारे दहा दिवस उशिराने सुरू झाल्या. त्याच सुरूवातीच्या काळात काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. मात्र, काही दिवसांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीत सुरू झाले. गेल्या वर्षी 25 मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा 5 दिवस उशिराने निकाल जाहीर केला जात आहे,असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.