वासनाकांड प्रकरणातील सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दाेष
By Admin | Updated: November 12, 2014 23:29 IST2014-11-12T23:18:07+5:302014-11-12T23:29:52+5:30
दहा साक्षीदार फितूर : ‘पिटा’अंतर्गत योग्य तपास न झाल्याने पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण

वासनाकांड प्रकरणातील सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दाेष
रत्नागिरी : चौदा वर्षीय मुलीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा व कुंटणखाना चालविण्यात आल्याचा आरोप ठेवून दाखल केलेल्या येथील वासनाकांड खटल्यात साक्ष व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज, बुधवारी रत्नागिरी येथील न्यायालयाने सर्व सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता केली.
या प्रकरणी २१ पैकी दहा साक्षीदार फितूर झाल्याने, तसेच या खटल्यात ‘पिटा’अंतर्गत योग्य तपास न झाल्याने पुरावे मिळू शकले नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सत्र न्यायाधीश एन. पी. कापुरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी जलदगतीने झाली. यात सातजणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. गेले काही दिवस या खटल्याची सुनावणी सुरू होती. सोमवार, तसेच मंगळवारी रात्रीपर्यंत सुनावणी सुरू होती. आज सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयात अंतिम सुनावणी झाली.
आरोपींतर्फे अॅड. केतन श्रीराम घाग, अॅड.प्रदीप नेने, अॅड. महेंद्र मांडवकर, अॅड. संकेत घाग, अॅड. अविनाश शेट्ये, अॅड. शमीम पडवेकर, अॅड. शिवराज जाधव, अॅड. प्रकाश सुर्वे व अॅड. रत्नदीप चाचले यांनी यांच्यासह ९ वकिलांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
माहिती अहवालात तफावत
पीडित मुलगी व प्रथम माहिती अहवाल यात तफावत असल्याचा युक्तिवाद स्वाती ठाकूर यांच्या वकिलांनी केला होता, तर अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास तिला अनेक दिवस वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. परंतु, तसे उपचार घेतल्याचे सरकारी पक्षाने कोठेही सांगितलेले नाही, असा युक्तिवाद अॅड. केतन घाग यांनी केला होता. या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
निर्दोेष सुटलेल्यांमध्ये स्वाती किशोर ठाकूर, सुशील शांताराम मांडवकर, जितेंद्र ऊर्फ जितू अनंत शेट्ये, प्रकाश ऊर्फ बाळू सदानंद साळवी, मदन यशवंत जोशी, राजाराम गोपीनाथ सावंत, हरेश रतिलाल छाभैया यांचा समावेश आहे.