अकलूज मुक्कामात बदल?
By Admin | Updated: June 5, 2017 00:36 IST2017-06-05T00:36:06+5:302017-06-05T00:36:06+5:30
अकलूजच्या श्री विठ्ठल मंदिराऐवजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजीत मोरे यांनी दिली.

अकलूज मुक्कामात बदल?
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार पालखी मुक्कामाला जागा कमी पडत असल्याने श्री संत तुकाराममहाराज पालखीचा मुक्काम अकलूजच्या श्री विठ्ठल मंदिराऐवजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजीत मोरे यांनी दिली.
आषाढी वारीच्या वाटेवरील पालखीचा मुक्काम यंदा प्रथमच माने विद्यालयात होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. मात्र, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या बदलाला ग्रामस्थांचा विरोध असून, तसा ग्रामसभेचा ठरावही प्रशासनाला दिला असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रशासनाच्या सूचनेनुसार व सोहळाप्रमुख व विश्वस्त असा निर्णय घेत असेल तर त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे तरी ऐकून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
सोहळा सुरू झाल्यापासून अकलूजचा मुक्काम येथील श्री विठ्ठल मंदिरात आहे. पूर्वी अकलूजची लोकसंख्या कमी होती. सध्या लोकसंख्या वाढली असून पालखीसाठी रस्ताही कमी पडत आहे. मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी धर्मादाय आयुक्तांनी २१ सूचनांसह दोन पानी सूचनापत्र दिले आहे. यानुसार अंमलबजावणी होत आहे. पालखी तळाबाबत काळानुरूप निर्णय घ्यावे लागणार असल्याचे अभिजित मोरे यांनी सांगितले. याची सुरुवात अकलूजपासून करणार असून या बदलामागे लोकभावनांचा अनादर करणे नसून सुरक्षितता आहे.
रिंगण आणि मुक्काम एकाच ठिकाणी
संस्थानच्या या निर्णयाने या वर्षी प्रथमच अकलूज येथे रिंगण व मुक्काम एकाच ठिकाणी होणार असल्याचे जवळजवळ निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत माने विद्यालयात मुक्काम व अकलूज येथील स्टेडिअममध्ये रिंगण करण्याचा संस्थानचा प्रस्ताव होता. मात्र, स्टेडिअमची काही कामे अपूर्ण असल्याने हे रिंगण उपलब्ध जागेवर होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. याबाबत अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की, या बदलाला ग्रामस्थांचा विरोध असून तसा ग्रामसभेचा ठरावही झाला आहे. तो प्रांतना दिला आहे.