अकोला, वाशिमला अवकाळीने झोडपले
By Admin | Updated: March 10, 2015 01:49 IST2015-03-10T01:49:06+5:302015-03-10T01:49:06+5:30
अकोला आणि वाशिम जिल्ह्णाला सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. दोन्ही जिल्ह्णांतील काही गावांमध्ये गारपीट होऊन

अकोला, वाशिमला अवकाळीने झोडपले
अकोला : अकोला आणि वाशिम जिल्ह्णाला सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. दोन्ही जिल्ह्णांतील काही गावांमध्ये गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
अकोला जिल्ह्णातील मूर्तिजापूर तालुक्यात सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली. कुरूम, मधापुरी, माटोडा या गावांमध्ये लिंबाच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम, मधापुरी, माटोडा, नवसाळ, रामटेक, जामठी, मंडुरा व वडगाव या गावांमध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारांचा वर्षाव सुरू झाला. ही गारपीट अर्ध्या तासापर्यंत सुरू होती. सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास गारपीट थांबली; मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरूच होता. वादळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, तूर, कांदा पिकांसह संत्रा, पपई व आंबा या फळपिकांचे व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच गावांमधील वीजपुरवठा खंडित होऊन, गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले.
वाशिम जिल्हयात सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात गारपीट, तर वाशिम, रिसोड येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. मालेगाव तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला, गहु, हरभरा, तसेच फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले़ (प्रतिनिधी)