अकोल्यात ४९ विद्यार्थिनींचा शिक्षकांकडूनच लैंगिक छळ
By Admin | Updated: April 1, 2015 02:02 IST2015-04-01T02:02:46+5:302015-04-01T02:02:46+5:30
बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

अकोल्यात ४९ विद्यार्थिनींचा शिक्षकांकडूनच लैंगिक छळ
अकोला : बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले. विद्यालयातील दोन शिक्षकांकडून गत चार वर्षांपासून छळ सुरू असल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
केंद्र शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिक्षक आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके हे विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करीत होते. या विद्यार्थिनींशी नेहमीच अशा प्रकारची लगट साधण्याचा प्रयत्न दोन्ही शिक्षक करीत होते. विद्यार्थिनींनी याला विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाही, विद्यालयातून काढून टाकले जाईल, अशा धमक्या त्यांनी दिल्या. या दबावामुळे विद्यार्थिनी दोन्ही शिक्षकांचा छळ चार वर्षांपासून निमूटपणे सहन करीत होत्या; मात्र एका विद्यार्थिनीने धाडस करून या प्रकाराची तक्रार २० मार्च रोजी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सिंह यांच्याकडे केली. सिंह यांनी चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे पाठविला. विद्यार्थिनीने तक्रार केल्याची माहिती मिळताच दोन्ही शिक्षकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन २५ मार्च रोजी तिच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. त्यानुसार विद्यार्थिनीने तक्रार मागे घेतली. दरम्यान, या प्रकरणाची एक तक्रार राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांच्याकडेही करण्यात आली होती. त्यानुसार मिरगे यांनी ३१ मार्च रोजी मुलींची चौक शी केली असता, नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींनी या दोन शिक्षकांविरुद्ध लेखी तक्रार दिली. त्यानंतर पालक-विद्यार्थ्यांची सभा घेण्यात आली आणि या प्रकरणाची तक्रार डॉ. आशा मिरगे यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिली. (प्रतिनिधी)