अकोला पंचायत समितीच्या दोन अधिका-यांना अटक
By Admin | Updated: June 8, 2016 02:27 IST2016-06-08T02:27:11+5:302016-06-08T02:27:11+5:30
बोरगाव मंजू शेतरस्ता अपहारप्रकरणी आरोपींस तीन दिवसांची पोलीस कोठडी.

अकोला पंचायत समितीच्या दोन अधिका-यांना अटक
बोरगाव मंजू (जि. अकोला) : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या दोन अधिकार्यांना बोरगाव मंजू पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २0१३ ते २0१५ या दरम्यान नऊ शेतरस्त्यांची कामे झाली होती. या कामांमध्ये हेराफेरी झाल्याची तक्रार झाल्यामुळे सहायक गटविकास अधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तपासादरम्यान या तक्रारीत सत्यता आढळली. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४७७, ४0९, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणातील आरोपी आनंद रमेश जानोदकर (३८) हे अकोला पंचायत समितीमध्ये कार्यक्रम अधिकारी असताना, शेतकर्यांचे मस्टर तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांनी एका मजुराचे नाव एकाच आठवड्यात दोन ठिकाणी लिहून शासकीय निधीचा अपहार केला, असा आरोप आहे. दुसरा आरोपी गणेश गुफालाल कहार हे पंचायत समिती येथे सहायक लेखाधिकारी होते. त्यांच्याकडे कुशल व अकुशल कामांसंबधी देयके तपासणीचे काम होते. त्यांनी चुकीची देयके मंजुरीसाठी पाठविली व कोणत्याही त्रुटी काढल्या नाहीत. दोन्ही आरोपी अधिकारी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची तीन दिवसांची कोठडी घेण्यात आली आहे. दोन अधिकार्यांना अटक झाल्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे. यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर तवर व हेडकॉन्स्टेबल देवानंद दंदी करीत आहेत.