अकोल्याच्या नगरसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा!
By Admin | Updated: August 3, 2015 00:57 IST2015-08-03T00:57:16+5:302015-08-03T00:57:16+5:30
येथे पर्यटनासाठी आलेल्या अकोला महापालिकेच्या नगरसेवक आणि त्यांच्या आठ मित्रांनी दारू पिऊन पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्टमध्ये मोडतोड केली

अकोल्याच्या नगरसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा!
नरेंद्र जावरे, चिखलदरा
येथे पर्यटनासाठी आलेल्या अकोला महापालिकेच्या नगरसेवक आणि त्यांच्या आठ मित्रांनी दारू पिऊन पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्टमध्ये मोडतोड केली. तसेच तहसीलदारांसह मॅनेजर व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणही केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी या सर्व नऊ जणांना अटक केली आहे.
अकोला महापालिकेचे नगरसेवक अजय रमेशचंद्र शर्मा (३७) हे आठ मित्रांसह चिखलदरा येथे फिरण्यासाठी आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आरक्षण न झाल्याने रात्री मुक्कामासाठी हे पर्यटक मोझरी पॉइंटस्थित पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्टमध्ये गेले. तेथे त्यांनी राहण्यासाठी खोल्यांची मागणी केली. मात्र, या रिसोर्टमध्ये आॅनलाईन आरक्षणव्यवस्था आहे. नगरसेवकांनी आगाऊ आरक्षण केले नसल्याचे मॅनेजर सुहास पारखी यांनी सांगितले.
पण मद्यधुंद नऊ जणांनी पारखी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून रिसोर्टमध्ये जेवणासाठी आलेले तहसीलदार आर. यू. सुराडकर यांनी स्वत:चा परिचय करून देत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नऊ जणांनी सुराडकर यांच्यासह मॅनेजर व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या नऊ लोकांनी अक्षरश: धिंगाणा घातला व रिसॉर्टची मोडतोड केली. याबाबत रिसोर्टचे संचालक सुहास सदाशिव पारखी यांनी चिखलदरा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अजय रामचंद्र शर्मा यांच्यासह इतर आठ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले. या नऊ जणांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती. त्यामुळे नगरपरिषदेच्या नाक्यावर या सर्वांना पोलिसांनी अटक केली.