अक्कूचे ४० अपराध पोलिसांनी केले बेदखल

By Admin | Updated: November 12, 2014 01:01 IST2014-11-12T01:01:28+5:302014-11-12T01:01:28+5:30

उत्तर नागपुरातील जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात अक्कू यादव याच्या सुमारे ४० अपराधांची पोलिसांनी दखलच घेतली नव्हती.

Akku's 40 crimes have been ejected by the police | अक्कूचे ४० अपराध पोलिसांनी केले बेदखल

अक्कूचे ४० अपराध पोलिसांनी केले बेदखल

सत्यशोधन अहवालातील खळबळजनक सत्य
राहुल अवसरे - नागपूर
उत्तर नागपुरातील जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात अक्कू यादव याच्या सुमारे ४० अपराधांची पोलिसांनी दखलच घेतली नव्हती.
ही धक्कादायक माहिती दिवंगत न्या. भाऊ वाहणे यांच्या अध्यक्षस्थानी गठित सत्यशोधन समितीच्या अहवालात नमूद आहे. यात बलात्कार, विनयभंग, लुटमार, प्राणघातक हल्ला आणि खंडणी वसुली आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. अक्कूच्या कृत्यास बळी ठरलेली महिला किंवा तरुणी बदनामी आणि दहशतीमुळे पोलिसात तक्रार करीत नव्हती. पीडित कुटुंब त्याच्या भीतीमुळे मोहल्ला सोडून निघून जात होते. अक्कूची ज्याही मुलीवर नजर पडत होती. तिचे अपहरण करून तो बलात्कार करायचा. त्याच्या तावडीतून सुटणे मुश्कील होते. त्याच्या भीतीमुळे अनेकांनी आपल्या मुलींना नातेवाईकांकडे ठेवले होते.
पीडिताने सोडली वस्ती
अक्कूच्या खुनाच्या घटनेच्या दहा महिन्यापूर्वी त्याने एका २२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला होता. पहाटे ३ वाजताच्या सुमारास तो आपल्या साथीदारांसह या महिलेच्या घरात घुसला होता. आधी तिच्या पतीला भोसकून जखमी केले होते. त्याला संडासमध्ये बंद करून पीडित विवाहितेचे केस ओढत तिला घरात नेले होते. त्यानंतर अक्कूसह साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित महिला या घटनेची तक्रार नोंदवण्यास पोलीस ठाण्यात गेली होती. परंतु पोलिसांनी तिच्यावर अक्कूसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. भयभीत होऊन ही महिला पतीसोबत वस्ती सोडून निघून गेली होती. बालाघाटहून मजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील महिलेवरही अक्कू आणि साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला होता. या टोळीचे आणखी एक क्रौर्य म्हणजे बारा-पंधरा जणांनी एका सात महिन्याच्या गरोदर महिलेवर बलात्कार केला होता. पीडित महिला रात्रभर वेदनेने विव्हळत होती. परंतु या शस्त्रधारी गुंडाचा प्रतिकार करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते.
अनेक वस्त्यांमध्ये साम्राज्य
अक्कूचा १३ आॅगस्ट २००४ रोजी न्यायालय कक्षात खात्मा होण्याच्या पूर्वी त्याची टोळी मार्टिननगर, मानकापूर, कुशीनगर, लष्करीबाग, बारा खोली, फरस, भीम चौक, जरीपटका, इंदोरा, इंदिरानगर आदी वस्त्यांमध्ये सक्रिय होती. अक्कू हा कस्तुरबानगरात राहत असल्याने ही वस्ती त्याच्या दहशतीतच वावरत होती.
साक्षीदार महिलेस संपवले होते
कस्तुरबानगर येथेच आशाबाई भगत नावाची एक महिला अवैध दारू विकून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होती. अक्कू आणि साथीदारांनी १९९७ मध्ये अविनाश तिवारी नावाच्या एका तरुणाचा दिवसाढवळ्या भोसकून खून केला होता. आशाबाई ही या खुनाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. २००१ मध्ये पहाटेच्या वेळी त्याने साथीदारांसह आशाबाईच्या घरात घुसून तिचा निर्घृण खून केला होता.
गंभीर स्वरूपाचे २४ ते २६ गुन्हे दाखल होऊनही त्याला पोलिसांनी केवळ १२ वेळा अटक केली होती. अटक झाल्यानंतर काही दिवसातच तो जामिनावर बाहेर पडायचा.
मुले आणि नातवंडेही गुन्हेगारीत
कालीचरणच्या मृत्यूनंतर त्याची मुले आणि नातवंडे गुन्हेगारीत सक्रिय होते. कालीचरणला सहा मुले आणि सहा मुली होत्या. अक्कू हा त्याचा सर्वात लहान मुलगा होता. त्याचा पहिला मुलगा लल्लू हा रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. दुसरा मुलगा चुटई यादव हा बेलिशॉप क्वॉर्टर आणि कडबी चौक भागातील कुख्यात गुन्हेगार होता. काही वर्षांपूर्वीच तो मरण पावला. चुटईचा मुलगा विजय ऊर्फ डंगऱ्या हा यादव कुटुंबात खतरनाक गुन्हेगार म्हणूनच निपजला.
त्याच्याविरुद्ध खुनाचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याचा सर्वाधिक काळ कारागृहातच गेला. कारागृहातूनही तो गुन्हे घडवून आणतो. तो नेहमी नशेत राहतो आणि मानसिकरीत्या विकृत आहे.
डंगऱ्याचा लहान भाऊ अमर हाही कमाल चौक मार्केट भागातील कुख्यात गुन्हेगार होता. चुटईपेक्षा लहान असलेला टिल्लू याचेच नाव युवराज आहे. तो अक्कूच्या खुनात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याला यादव कुटुंबातील ‘मास्टर मार्इंड’ म्हटले जाते.
पोलीस आणि न्यायालयातील प्रकरणे हाताळण्यात तो पटाईत आहे. टिल्लूची दोन मुले मनीष ऊर्फ भोला आणि रितेश हेही कुख्यात गुन्हेगार आहेत. ते सुपारी घेऊन खून करतात, असेही या अहवालात नमूद आहे. भोला हा सध्या यवतमाळमध्ये पानठेला चालवितो. गेंदलाल ऊर्फ छोटे भय्या हा कालीचरणचा पाचवा मुलगा, तो सक्करदऱ्यात राहतो.
अक्कू पोलीस खबऱ्याही होता
प्रारंभी अक्कू हा बांधकामाच्या ठिकाणाहून बांधकाम साहित्य चोरी करून ठेकेदारांनाच कमी किमतीत विकायचा. त्यानंतर त्याने पोलिसांशी मधुर संबंध जुळवले होते. तो पोलीस खबऱ्या म्हणूनही काम करायचा.
कालांतराने गुंडांची संघटित टोळी तयार करून तो जरीपटका आणि कोराडी भागात चोऱ्या व लुटमार करायचा. तो तरुणांना जबरदस्तीने आपल्या टोळीत सहभागी करून घ्यायचा. त्यांना प्रशिक्षण द्यायचा. त्यामुळेच टोळीतील लोक त्याला ‘मॅडम’ म्हणायचे. (प्रतिनिधी)

Web Title: Akku's 40 crimes have been ejected by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.