आखाड्यांची मंडप उभारणी सुरू
By Admin | Updated: July 24, 2015 01:09 IST2015-07-24T01:09:05+5:302015-07-24T01:09:05+5:30
महाकुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील विविध आखाड्यांच्या ध्वजारोहणाचा दिवस जवळ येऊ लागल्याने प्रवेशद्वार, सभामंडप, जप-ध्यान,

आखाड्यांची मंडप उभारणी सुरू
नाशिक : महाकुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील विविध आखाड्यांच्या ध्वजारोहणाचा दिवस जवळ येऊ लागल्याने प्रवेशद्वार, सभामंडप, जप-ध्यान, कुटी उभारणीच्या कामाला वेग आला आहे. खालसा आणि मोठ्या आखाड्यांमध्ये सत्संगासाठी भव्य मंडप उभारणी करण्यात येत असून, मंडपासाठी सुमारे २० ते ३० लाखांचे खर्च असल्याचे आखाड्यांच्या काही महंतांनी सांगितले.
खालसा, आखाड्यांनी मंडप उभारणीस प्रारंभ केला आहे. वाटप झालेल्या प्लॉटवर मंडप उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थान, गुजरात कार्यक्षेत्र असलेल्या त्रिवेणीधाम जयपूर, ब्रह्माणपीठ, डाकोर खालसाचे महंत रामवृक्षपाल महाराज यांनी सांगितले की, आमच्या खालशामध्ये एकूण पाच उपविभाग असून, प्रत्येक खालशाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात येत आहे. या कामासाठी मध्य प्रदेशतील महू येथून मंडप मागविला असून, त्याची उभारणी सुरू आहे. या कामासाठी साधारणत: ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
औरंगाबाद रोडवरील स्वामी जनार्दन स्वामींच्या अलीकडेच डाकोर खालशाला जागा मिळाली आहे, तर त्यालगतच असलेल्या महामंडलेश्वर भय्यादास महाराज यांच्या बालाजीधाम (बागवत) संचलित श्री परमहंसधाम असून, या ठिकाणी लोखंडी अॅँगल्सच्या साह्याने मोठा डोम उभारण्यात येत आहे. या डोममध्ये बालसाध्वी राधादेवी यांचा सत्संग होणार आहे. तसेच भंडारा, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमही होणार आहे. या डोम उभारणीसाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
चतुसंप्रदाय आखाड्यातील मंडप उभारक्ष, जपध्यान कुटिया, संत-महंत निवास, भक्तनिवास आदी कामे पूर्णत्वाकडे जात असल्याचे व्यवस्थापक अरविंद मिश्रा यांनी सांगितले. श्री महंत गुरू अर्जुनदास महाराज यांच्या श्री स्वामी हरिबाबजी आश्रमातील तंबू उभारणीसह सर्व कामे पूर्णत्वाकडे आली असल्याचे महंत माधवदास महाराज यांनी सांगितले.