अजोय मेहतांना दिल्लीत बढती?
By Admin | Updated: May 7, 2017 04:56 IST2017-05-07T04:56:45+5:302017-05-07T04:56:45+5:30
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे केंद्रात सचिव म्हणून बढतीसाठी एम्पॅनलमेंट झाले आहे. मात्र ते दिल्लीला

अजोय मेहतांना दिल्लीत बढती?
विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे केंद्रात सचिव म्हणून बढतीसाठी एम्पॅनलमेंट झाले आहे. मात्र ते दिल्लीला जाणार की मुंबईतच राहणार याचा निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून आहे.
मेहता यांच्या सोबत त्यांच्याच बॅचचे अजयभूषण पांडेय आणि मालिनी शंकर यांचेही एम्पॅनलमेंट झाले, मात्र ते दोघे आधीच केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यांच्यानंतरच्या बॅचचे संजय भाटिया आणि भगवान सहाय यांचेही एम्पॅनलमेंट झाले आहे. त्यापैकी भाटिया मुंबई पोर्ट ट्रस्टला केंद्राच्याच नियुक्तीवर कार्यरत आहेत. देशभरातून एम्पॅनलमेंट होणाऱ्या सचिवांमधून काही सचिवांना केंद्र सरकार त्यांच्या सेवेत घेत असते. महाराष्ट्रातून एम्पॅनलमेंट झालेले पाचपैकी तीन अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मेहता यांची नियुक्ती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या मंत्रालयात होणार असल्याची चर्चा असताना ते लोकमतशी बोलताना म्हणाले दिल्लीत जायचे की नाही याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. आणि निवडीचे अधिकार केंद्र शासनाचे आहेत. दिल्ली हे माझे होमटाऊन आहे आणि महाराष्ट्रात माझी कारकीर्द गेली आहे, त्यामुळे कुठेही काम करायला मिळाले तरी मला सारखाच आनंद आहे.
मुंबईचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांचीसुद्धा मुंबई बाहेर नागरी हक्क संरक्षण, नांदेड येथे अधीक्षक पदी झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा मुंबईमध्ये फोर्स वन येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. हे नियुक्ती आदेश रद्द करत त्यांना फोर्सवनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पद देण्यात आले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची नवी मुंबईच्या सह आयुक्तपदी नेमणूक बदली रद्द करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये सहायक पोलीस महानिरीक्षक पदावर केलेली बदली रद्द करत अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून नवनियुक्ती देण्यात आली आहे.
पुणे शहरचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांना मुंबईमध्ये उपायुक्तपदी देण्यात आलेली नियुक्तीसुद्धा रद्द करत राज्य राखीव पोलीस बल गट दौड येथे समादेशक म्हणून पाठविण्यात आले आहे.
नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त व्ही. जी. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथे करण्यात आलेली बदली थांबवून त्यांना महामार्ग सुरक्षा पथक मुख्यालय मुंबई येथे पोलीस अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे.