अजितराव घोरपडे, जगताप यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: September 8, 2014 02:44 IST2014-09-08T02:44:33+5:302014-09-08T02:44:33+5:30
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जतचे विलासराव जगताप यांचा भाजपाप्रवेश निश्चित झाला आहे.

अजितराव घोरपडे, जगताप यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब
सांगली : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जतचे विलासराव जगताप यांचा भाजपाप्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे त्यांचा प्रवेश होईल, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अजितराव घोरपडे यांनी लोकसभेपासूनच भाजपचे काम सुरू केले होते. आता अधिकृतरीत्या ते पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
तसेच विलासराव जगताप यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम अद्याप निश्चित झाला नसला, तरी त्याबाबतचेही नियोजन लवकरच होईल, असे संजय पाटील म्हणाले. तासगाव-कवठेमहांकाळ हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. जयसिंगराव शेंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे तेही महायुतीचे नेते म्हणून आमच्यासोबत आहेत. उमेदवारीचा आग्रह दोन्ही पक्षांचा असला, तरी शेवटी पक्षीय पातळीवर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आबा म्हणजे विदूषक आहेत. त्यांच्याकडून अस्तित्वासाठी सुरू असलेल्या केविलवाण्या प्रयत्नांकडे कुणीही लक्ष देण्याच्या मन:स्थितीत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)