अजितराव घोरपडेंनीही दर्शविला हिरवा कंदील
By Admin | Updated: March 23, 2015 00:45 IST2015-03-22T23:57:54+5:302015-03-23T00:45:12+5:30
भूमिका जाहीर : तासगाव-कवठेमहांकाळ निवडणूक

अजितराव घोरपडेंनीही दर्शविला हिरवा कंदील
सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता अजितराव घोरपडेंनीही हिरवा कंदील दर्शविला आहे. भाजपने घेतलेल्या निर्णयाशी आपण बांधील असल्याचे त्यांनी सांगून, निवडणूक न लढविण्याची भूमिका आज, रविवारी जाहीर केली.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने आवाहन केल्यानंतर काँग्रेस, शिवसेना, शेकाप, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांनी त्यास लगेच प्रतिसाद देत निर्णय घेतले. मात्र भाजपने लवकर निर्णय घेतला नव्हता. संजय पाटील आणि घोरपडे यांनी गत आठवड्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ही पोटनिवडणूक भाजपने लढवावी, असा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे सादर केला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत याबाबत चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत तसेच दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून, निवडणूक न लढविण्याची भूमिका जाहीर केली.
पक्षाची भूमिका निश्चित झाल्यानंतरही अजितराव घोरपडे यांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केली नव्हती. कार्यकर्त्यांचा आग्रह वाढत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज, रविवारी पुन्हा त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि पक्षीय निर्णयाप्रमाणे निवडणूक न लढविण्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळे आता आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोधची घोषणा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अर्ज दाखल होऊ शकतात. काही अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने त्यांनाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटणार असल्याचे राष्ट्रवादी कार्यालयातून सांगण्यात आले.
घोरपडे यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य करावे, यासाठी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते शनिवारी रात्री घोरपडेंना भेटले. त्यांना पक्षाच्यावतीने विनंती करण्यात आली. समर्थकांशी चर्चा करून रविवारी निर्णय जाहीर करू, असे त्यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार घोरपडे यांनी भूमिका जाहीर केली. काही अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात राहण्याची चिन्हे दिसू लागल्याने राष्ट्रवादी नेत्यांनी अशा अपक्षांचीही समजूत काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अर्ज भरताना सर्वपक्षीय उपस्थिती
सुमनताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तासगाव येथे निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे व अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा दिला आहे. काही अपक्षांनी अर्ज भरले आहेत. त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. निश्चितपणे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा आम्हाला आहे.
- विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
तालुक्यातील कार्यकर्ते, समर्थक यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्याशी अनेकदा चर्चाही झाली आहे. तरीही पक्षीय आदेश अंतिम समजून ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.
- अजितराव घोरपडे, नेते, भाजप