भ्रष्टाचारप्रकरणी अजित पवारांची चौकशी करा !

By Admin | Updated: March 13, 2015 23:56 IST2015-03-13T23:21:58+5:302015-03-13T23:56:21+5:30

उदयनराजेंची जोरदार मागणी : ‘अ‍ॅन्टी करप्शन’ने सर्वच मंत्र्यांचा शोध घ्यावा; मला कोणीही बंधने घालू शकत नाही

Ajit Pawar's inquiry into corruption! | भ्रष्टाचारप्रकरणी अजित पवारांची चौकशी करा !

भ्रष्टाचारप्रकरणी अजित पवारांची चौकशी करा !

फलटण : ‘आघाडी सरकारवर अनेक मर्यादा होत्या, असे तत्कालीन प्रत्येक मंत्र्यांचे म्हणणे होते. मग एवढा मोठा भ्रष्टाचार होत असतानाही त्यावेळी सर्वजण का गप्प होते? मागील सरकारच्याच काळात पाटबंधारे अन् इतर खात्यांत मोठा भ्रष्टाचार झाला असून, माजी उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित सर्वच मंत्र्यांची अँटी करप्शनमार्फत चौकशी करावी,’ अशी मागणी खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत राष्ट्रवादीच्याच खासदाराने अनेक आरोप केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ‘नीरा-देवघर’ प्रकल्पाचे प्रलंबित कालवे व बारामती-इंदापूूरला सोडले जाणारे पाणी, यासंदर्भात पुणे पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी कोळकी येथील इरिगेशन बंगल्यावर करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते.
‘हा जिल्हा शरद पवारांचा जिल्हा म्हणतात; मात्र माझा मतदारसंघ संपूर्ण देश असून, मी कोठेही जाऊन लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. त्यांची सुख-दु:खे जाणून घेऊ शकतो. मला कोणतीही सीमा नाही अन् कोणी बंधन घालूही शकत नाही. कृष्णा खोऱ्याची नियोजनाप्रमाणे कामे झाली असती तर पाण्यासाठी लोकांना भटकावे लागले नसते. सत्तेच्या जोरावर अधिकाऱ्यांचा बळी घेणे चुकीचे असून, त्यांच्यावर दबाव आणणे, बदलीच्या धमक्या देणे, याला पूर्वीच आळा बसायला पाहिजे होता. कृष्णा खोऱ्यातील भ्रष्टाचारासंदर्भात आपण वारंवार आवाज उठविला असून, यासंदर्भात कोणीच उत्तर देत नाही. फलटणचा कोणताही चौक निवडा. आपण समोरासमोर बोलू. खरे तर, संबंधितांना चॅलेंज द्यायची पण त्यांची पात्रता नाही; तरी पण मी चॅलेंज देत असून, तुम्ही येऊच शकत नाही. कारण तुम्हाला बोलायलाच जागा नाही,’ असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.
बैठकीला विरोधकांचा गोतावळा
खासदार उदयनराजे भोसले यांच्या बैठकीला राष्ट्रवादी कॉँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांतील नेतेमंडळी आवर्जून उपस्थित होती. कॉँग्रेसचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, भाजपचे अनुप शहा, शिवसेना तालुकाप्रमुख शंभूराज खलाटे, आदी उपस्थित होते. बंद दाराआडही त्यांनी विरोधकांशी चर्चा केली. सर्वांसोबत स्नेहभोजनही घेतले.

रामराजेंच्या उमेदवारीला विरोध
‘शरद पवारांना हात जोडून विनंती आहे की, विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी जर तुमच्याकडे माणसे शिल्लक राहिली असतील, तर योग्य माणूस निवडा,’ असे सांगताना उदयनराजेंनी रामराजेंच्या उमेदवारीलाही विरोध केला.
 

उदयनराजेंना पक्षाबद्दल किंवा आमच्याबद्दल जे काही बोलायचे आहे, बोलू
देत. जेव्हा त्यांचं सारं बोलणं संपेल, त्या दिवशी त्यांनी तसं जाहीर करावं. मग त्यांना काय अन् कसं उत्तर द्यायचं, हे
आम्ही ठरवू.
- रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री

फलटण येथे शुक्रवारी आयोजित बैठकीत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, हिंदुराव नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Ajit Pawar's inquiry into corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.